कोल्हापूर : महापालिकेच्या शाळेतील इयत्ता दुसरीच्या सेमी इंग्रजी वर्गात मुलाचा प्रवेश निश्चित झाल्याचे समजताच पालकांनी पेढ्याचा बॉक्स घेऊन शाळा गाठली आणि उपस्थितांना पेढे वाटून आनंद साजरा केला. विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास संपादन करणारी ही किमया साधली आहे, जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग या विद्यामंदिराने!
महापालिकेच्या शाळेतील गुणवत्ता, शैक्षणिक दर्जावर विश्वास दर्शविणारी ही घटना आहे.
महापालिकेच्या सर्वच शाळांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. सुसज्ज इमारती, ई-लर्निंग, सेमी इंग्रजी वर्ग, बोलक्या भिंती, ज्ञान रचनावाद इत्यादी महापालिकेच्या अनुभवी शिक्षक वर्गाने स्वत:चे असे शैक्षणिक व्हिडिओज बनविलेले आहेत. शिवाय गुगल मीट, झूम, वेबेक्स इत्यादींच्या माध्यमातून प्रभावी अध्यापनास सुरुवात केलेली आहे. शिक्षक पालकांशी वेळोवेळी संपर्क साधत आहेत. त्यामुळे पालक वर्ग महापालिका शाळांकडे आकर्षित होत आहे.
जरगनगर विद्या मंदिरने गुणवत्तेचा मानदंड निर्माण केला आहे. शालेय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व अन्य स्पर्धा परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी यशाचा झेंडा फडकविला आहे. यावर्षी या शाळेची पटसंख्या २२१० पर्यंत पोहचली आहे. दरवर्षी या शाळेत गुढीपाडव्यादिवशी प्रवेश फुल्ल होतात. यंदाही ही परंपरा कायम राहिली आहे. शाळेने गुणवत्ता टिकवण्यासाठी घेतलेले कष्ट, सरकारी शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यार्थ्यांच्या संख्येची चढती कमान या गोष्टींची शाबासकीची जणू मुलांच्या वाढत्या प्रवेशाने मिळाली आहे.
शिक्षकांना व शाळेला सुद्धा विविध आदर्श पुरस्कारांनी सन्मानित केले. दरम्यान, या आठवड्यात एका पालकाने आपल्या पाल्याला सेमी इंग्रजी वर्गात प्रवेश मिळाला म्हणून शाळेत पेढे वाटप केले. ही घटना शिक्षकांना प्रोत्साहित करणारी आहे. महापालिकेच्या सर्वच शाळांना उदंड पालकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
फोटो क्रमांक - २५०६२०२१-कोल-केएमसी स्कुलबोर्ड
ओळ - महानगरपालिकेच्या लक्ष्मीबाई जरग विद्यालयात आपल्या पाल्यांना प्रवेश मिळाला म्हणून पालकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.