कोल्हापूर : जरगनगर येथील महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग शाळेत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पाल्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी पालकांनी सोमवारी (दि. ८) रात्रीच रांगा लावल्या. पालकांना रात्रभर ताटकळत ठेवण्यापेक्षा शिक्षकांनी टोकण देऊन त्यांना परत पाठवले. आज, मंगळवारी सकाळी प्रवेशाचा श्रीगणेशा होणार आहे.श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग या शाळेने गुणवत्ता सिद्ध करून नावलौकिक वाढवला आहे. स्पर्धा परीक्षांसह विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या या शाळेत पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड असते. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेशासाठी पालकांची मोठी गर्दी असते. नेहमीप्रमाणे यंदाही गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येलाच पालकांनी शाळेच्या आवारात रांगा लावल्या.सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या पहिलीच्या वर्गातील ३०० जागांसाठी सुमारे ३५० पालक रांगेत उभे होते. पालकांना रात्रभर थांबावे लागू नये, यासाठी शिक्षकांनी टोकण देऊन त्यांना घरी पाठवले. टोकणनुसार मंगळवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती शिक्षकांनी दिली. तरीही रात्री अकरापर्यंत पालकांची गर्दी कायम होती.२३०० वर विद्यार्थी संख्यादोन सत्रात चालणारी महापालिकेची ही पहिली शाळा आहे. पहिली ते सातवीच्या वर्गात २३०० हून अधिक विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी सातत्याने विशेष यश संपादन केले आहे. तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे ही शाळा चर्चेत असते.
कोल्हापुरात महापालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी रात्रीच पालकांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 5:18 PM