तानाजी पोवार -- कोल्हापूर--राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून परीट समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. या परीट समाजाचा पारंपरिक व्यवसाय परीटकाम हाच आहे. काळाच्या ओघात बदल घडत गेले व कुटुंब वाढत गेले, त्याप्रमाणे हा समाज शिक्षण, नोकरी, व्यवसायामुळे शहराबाहेरही विखुरला आहे. त्यामध्ये लिंगायत परीटही सक्रिय आहेत. संत गाडगेबाबांच्या तत्त्वांनुसार चालणारा हा परीट समाज आहे. शहरात सर्व बलुतेदारांच्या इमारती, शिक्षणसंस्था व वसतिगृहे आहेत; पण परीट समाजाला कोणतीच सुविधा नाही, धोबीघाटही नाहीत. हा समाज सांस्कृतिक हॉलपासूनही वंचित आहे. असा हा परीट समाज ‘लोकमतसंगे जाणून घेऊ.’कोल्हापूरातील परीट समाज हा खर्डेकर बोळ, हुजूर गल्ली, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ येथे पूर्वीपासूनच राहत आलेला आहे. बदलत्या परिस्थितीनुसार हा समाज शिक्षणात पुढारत गेला. तो नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने सर्वत्र विखुरला आहे. समाज एकसंध ठेवण्यासाठी तसेच विकासासाठी खऱ्या अर्थाने चालना १९६० ला चाळीसगावच्या परीट समाजाच्या राज्य अधिवेशनात मिळाली. त्यातूनच कोल्हापुरात बिंदू चौकातील पर्ल वॉशिंग कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर परीट समाज संघ सुरू केला. त्यामध्ये अॅड. आर. वाय. रसाळ, नाचणकर (रत्नागिरी), दत्तोबा लिंगम, करण वॉशिंग कंपनीचे यादव, लक्ष्मण यादव (निपाणी), ट्रकवाले रसाळ (राजारामपुरी), अनंतराव वठारकर, रघुनाथ म्हेत्तर यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात संघटना बांधण्याचा प्रयत्न केला. आझाद गल्लीतील विठ्ठल मंदिरात समाजातील मुलांना शालेय साहित्य वितरणाचा पहिला कार्यक्रम झाला. १९६१ ते १९६२ दरम्यान दत्तोबा लिंगम यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची स्थापना झाली. त्यावेळी सीताराम बापू राशिवडेकर, जयसिंग रसाळ, बाबूराव यादव, श्रीकृष्ण लोखंडे, बबन म्हेत्तर यांनी धुरा सांभाळली. समाजाची सध्याच्या इमारतीची जागा भुईभाड्याने होती. त्या जागेत १९७७ मध्ये कौलारू इमारत होती. १९७६ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर जोतिबा रोडवर संत गाडगेबाबा क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. १९७९ ला जोतिबा रोडवर संत गाडगेबाबा यांचा पुतळा उभा करण्याचा ठराव कोल्हापूर महापालिकेत झाला. गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त २० डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रातील त्यांचा पहिला पुतळा श्री अंबाबाई मंदिर चौकात उभारला. त्यावेळी समाजाच्या वतीने सुमारे दहा हजार लोकांना मोफत झुणका-भाकर वाटप झाले होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपपाळ कोल्हापुरात आल्या होत्या.संस्थेचे साहित्य मिळण्याचे दुकान बंद पडल्यानंतर ती जागा बाजीनाथ कोरडे विद्यालयाला दिली. तेथे तीन वर्गांत विद्यार्थी बसत होते. १९९३ मध्ये बाबूलकर सरांनी ही शाळा रिकामी करून दिली. त्यानंतर समाजाच्या इमारतीची जागा भुईभाड्याने दिली होती. ती जागा कोल्हापूर नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष हारुण फरास, नगरसेवक केशवराव जगदाळे यांच्या सहकार्याने खरेदी करून स्वखर्चाने दुमजली इमारत बांधली. तिचे उद्घाटनही तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी समाजाची पतपेढी आणि कंझ्युमर स्टोअर्स असे स्वतंत्र परवाने होते. ते एकत्रित करून १९९४ मध्ये समाजाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच उद्योगधंद्यांसाठी, महिला व बांधवांना अर्थसाहाय्य करून समाजाची चांगली घडी बसविली. सध्या सोसायटीची सभासद संख्या १०५६ आहे. संत गाडगे महाराज को-आॅप. सोसायटीची स्थापना केली. आता गेली आठ वर्षे या संस्थेचे कामकाज अध्यक्ष दीपक म्हेत्तर पाहत आहेत. आता हा समाज पुढारलेला आहे; पण पारंपरिक व्यवसायापासून अद्याप म्हणावा तसा बाजूला आलेला नाही; पण अद्ययावत यंत्रसामग्री वापरून हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला आहे.शहराप्रमाणे तालुका पातळीवर समाज विखुरला आहे. त्यामध्ये लिंगायत परीटही सक्रिय आहे. तसेच समाजाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे हे वधू-वर पालक मेळावा घेऊन महाराष्ट्रातील समाजबांधवांना एकत्र करीत आहेत. दीपक लिंगम हे शहराध्यक्ष आहेत. साहित्य पाचपट कमी दराने उपलब्धसन १९७६ मध्ये समाजातील व्यवसायासाठी लागणाऱ्या नीळ, सोडा, साबण या साहित्यांचा तुटवडा होता. त्यामुळे या साहित्याचे दर बाजारात पाचपटीने वाढले होते. त्यामुळे संस्थेने पद्मा चित्रमंदिरानजीक दुकान सुरू करून बाजारभावापेक्षा पाचपटींनी कमी दरात व्यवसायासाठी लागणारे साहित्य दिले. ती एजन्सी एम. आर. जाधव यांना दिली होती. दुसऱ्या दुकानगाळ्यात संस्थेने लाँड्रीही सुरू केली. त्यावेळी धुण्याचा सोडा ४० पैसे किलो होता. आज तो ४० रुपये किलो झाला आहे. त्यावेळी इतक्या कमी दराने हे साहित्य सर्व सभासदांना मिळत असे. त्यामुळे प्रतियुनिट तीन किलो सोडा देण्याचा नियम लावला होता; पण हा नियम १९८० ते ८५ यादरम्यान होता. त्यानंतर त्यावरील नियंत्रण उठले. त्यानंतर इमारत भाडे, आदी खर्च परवडेनासे झाला. त्यामुळे हे दुकान बंद करावे लागले.चाळीसगाव येथे झालेल्या समाजाच्या राज्य अधिवेशनातून कोल्हापुरात समाजाची मुहूर्तमेढ रोवण्यास चालना मिळाली. त्यात मला विद्यार्थिदशेमध्येच अनेकांचे सहकार्य लाभले. समाजाला एकत्र करणे हा एकमेव उद्देश ठेवला आणि समाजाला चालना मिळाली. आजच्या परिस्थितीत संस्थेची स्वमालकीची इमारत करून दिली असून, आता ही समाजाची धुरा तरुण पिढीच्या ताब्यात दिली आहे. - श्रीकृष्ण लोखंडे, संस्थापक, कोल्हापूर परीट समाज
काळाच्या ओघात बदलला परीट समाज
By admin | Published: September 20, 2015 11:05 PM