कोल्हापूर : राधानगरी रोडवर नवीन वाशीनाकानजीक भरधाव डंपरखाली सापडून मोपेडस्वार जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मधुकर मारुती पाटील (वय ५५ रा. परिते, ता. करवीर), असे ठार झालेल्याचे नाव असून, साताप्पा पांडुरंग पाटील (वय ५७, रा. परिते), असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मधुकर पाटील व साताप्पा पाटील हे दोघे मोपेडवरून परितेहून काही कामानिमित्त रविवारी सायंकाळी कोल्हापूरकडे येत होते. नवीन वाशीनाकानजीक त्यांच्या मोपेडला डंपर ओव्हरटेक करून पुढे जात होता. त्यावेळी रस्ता दुभाजकाचा अडथळा आल्याने दोन्हीही वाहनांची धडक झाली. अपघातात मोपेडस्वार दोघेही रस्त्यावर पडले. त्यावेळी डंपरचे चाक मधुकर पाटील यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले, तर साताप्पा पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघाताची वर्दी मिळताच १०८ रुग्णवाहिकेने दोघांनाही तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच मधुकर पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी साताप्पा पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिते येथील अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांनी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. मधुकर पाटील हे ठार झाल्याची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश केला.
अपघातात ठार झालेले मधुकर पाटील हे कुशल शेतकरी होते, तसेच त्यांचा जेसीबी मशीनचा व्यवसाय होता. त्या कामासाठीच ते कोल्हापूरला येत असताना दुर्घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
फोटो नं. २१०३२०२१-कोल-मधुकर पाटील(डेथ)