कोल्हापूर : बिंंदू चौकात मनमानी पद्धतीने पार्किंग ठेका चालविणाऱ्या ठेकेदारास गुरुवारी सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले. कार्यकर्त्यांचा रोष पाहून अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी, ठेक्यास आयुक्तांनी मुदतवाढ दिली आहे. मात्र, प्रवाशांच्या लुटीबाबत आलेल्या तक्रारींवर प्रशासन कठोर कारवाई करील, असे आश्वासन दिले. दरम्यान, आंदोलनाच्या दणक्याने बिंदू चौकात तणावाचे वातारण पसरले.अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने लावण्यासाठी तासिक भाडे तत्त्वावर बिंदू चौक येथे ‘केएमटी’च्या जागेवर पार्किंगचा ठेका दिला आहे. त्याची मुदत ९ जूनला संपली आहे. ठेकेदाराकडून भाविकांना दमदाटी करुन अवैधरीत्या पद्धतीने वसुली केली जाते, अशी तक्रार अनेक वेळा केली. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. याचाच उद्रेक होऊन आंदोलकांनी भाविकांची लूट उघड केली.भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी येथे पार्किंग केलेल्या वाहनचालकांकडे चौकशी केली. यावेळी ठेकेदाराने दिनांक व वेळ नसलेल्या पावत्या दिल्या. तासाला तब्बल तीनशे रुपये उकळल्याचे उघड झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी ठेकेदाराची केबिन व इतर साहित्य विस्कटले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व ‘केएमटी’चे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांनाही त्यांनी बोलावून घेतले. अधिकाऱ्यांना जाब विचारला. पार्किंगचे पैसे दुप्पट व तिप्पट पद्धतीने घेतले जाते, याचा समक्ष पुरावा त्यांनी अतिरिक्त आयुक्त देसाई यांना दिला. यामुळे ठेकेदाराने तेथून पळ काढला. येथे बेकायदेशीरपणे व ठेका कराराचा उल्लंघन करीत ठेकेदाराने विविध वस्तू विकण्याचे केबिन टाकल्याचे पोलीस प्रशासनाला व महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. ‘स्थायी’ सभापती आदिल फरास यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात नगरसेवक सुभाष रामुगडे, संतोष भिवटे, विजय जाधव, संदीप देसाई, हेमंत आराध्ये, किशोरी स्वामी, भारती जोशी, आदींचा सहभाग होता.बिंदू चौकातील ठेक्याबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी सायंक ाळी एक वर्षासाठी मुदतवाढ दिली. शहरातील सर्वांत अधिक वर्दळ व मिळकत असणाऱ्या ठेक्यास मुदतवाढ देताना कोणतीही स्पर्धा निविदा राबविली गेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, ठेक्यास मुदतवाढ देताना १५ टक्के वाढ केली आहे. फक्त एक वर्षासाठीच ठेका असेल, असा खुलासा आयुक्तांनी केला आहे.
बिंदू चौकातील पार्किंग ठेकेदारास पिटाळले
By admin | Published: June 19, 2015 12:34 AM