कोल्हापूर : सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे रविवारी कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी झाली होती. पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे अनेकांनी रस्त्याच्या बाजूलाच वाहने लावली. यामुळे प्रमुख चौकात काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. महापालिकेकडून पार्किंग व्यवस्थेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्यामुळे पुन्हा पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. शनिवार व रविवार सलग दोन दिवस शासकीय सुट्ट्या असल्यामुळे गर्दीत वाढच होत आहे. रविवारीही हिच स्थित कायम होती. अंबाबाई मंदिर, रंकाळा तलावाच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत प्रमुख रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
चौकट
सध्या सरस्वती टॉकीज येथे बहुमजली पार्किंगचे काम सुरु असल्यामुळे येथील पार्किंग बंद आहे. वाढत्या पर्यटकांमुळे बिंदू चौकातील जागाही कमी पडत आहे. व्हिनस कॉर्नर येथील पार्किंगचा वापर फारसा होताना दिसून येत नाही. दसरा चौकातील मैदानावर वाहने लावण्याची वेळ येत आहे. महापालिकेने वाढत्या पर्यटकांचा विचार करून वेळच्यावेळी पार्किंगचे नियोजन केले नसल्याचा फटका आता बसत आहे.
चौकट
पर्यटकांवर पार्किंगची जागा शोधण्यासाठी फेऱ्या मारण्याची वेळ
पर्यटक अंबाबाई मंदिर परिसरात आल्यानंतर बिंदू चौकातील पार्किंगकडे गेले; मात्र दुपारी १२ वाजताच तेथील पार्किंग फुल्ल झाल्यामुळे पर्यटकांना दसरा चौकाकडे पाठविण्यात आले. या दरम्यान अनेक पर्यटकांना पार्किंगची जागा शोधण्यासाठी फेऱ्या मारण्याची वेळ आली.
फोटो : १००१२०२० कोल केएमसी पार्कींग न्यूज
ओळी : कोल्हापुरातील बिंदू चौक येथील पार्किंग फुल्ल झाल्यामुळे अनेकांनी वाहने परिसरात लावली होती. यामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली.