कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यादिवशी जास्तीत जास्त ख्रिस्तीबांधवांनी ऑनलाईन भक्ती व उपासनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन वायल्डर मेमोरियल चर्चचे ट्रस्टी चेअरमन आनंद म्हाळंगेकर यांनी केले आहे.
ख्रिस्ती बांधवांचा पवित्र दु:ख सहनाच्या आठवड्याला रविवारपासून सुरुवात झाली आहे. झावळ्यांच्या रविवारच्या सर्व उपासना देखील शासकीय नियमांचे पालन करुनच करण्यात आल्या. शहरातील सर्वच चर्चमध्ये नियमांच्या अधिन राहूनच प्रार्थना सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच रात्री आठनंतर सर्व प्रार्थना, भक्ती, उपासना, स्थगित करण्यात आल्या आहेत. आज (गुरुवार)ची भक्ती सायंकाळी पाच वाजता आयोजित केली आहे तर उद्या (शुक्रवारी) गुड फ्रायडे भक्ती उपासनांची वेळ कमी करण्यात आली आहे. एका वेळेस पन्नास लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी ऑनलाईन भक्ती उपासनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही म्हाळुंगेकर यांनी केले आहे.