कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या कटात कोल्हापुरातील एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे नाव, पत्ता सांगण्यास संशयित आरोपी शरद कळसकर टाळाटाळ करत आहे.हत्येसाठी पिस्तूल तयार करण्याची व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कळसकरवर सोपविली होती. त्याने आपला मोबाइल व डायरी फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे ‘एसआयटी’च्या तपास अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले.पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित कळसकरच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले.संशयित शरद कळसकर हा केसापुरी, औरंगाबाद येथे राहणारा आहे. या शहरात त्याला सोबत घेऊन तपास करायचा असल्याने त्याला वाढीव सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकीलअॅड. शिवाजीराव राणे व तपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी न्यायालयास केली. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांनी २४ जूनपर्यंत कोठडी सुनावली.
गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या कटात कोल्हापुरातील एकाचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 2:35 AM