कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून पक्षीय कामाला वाहून घेतलेले शिवसेना नेते दिवाकर रावते मंत्री झाल्यानंतरही त्यांच्या जुन्या सवयी अद्यापही काही बदललेल्या नसल्याचे गुरुवारच्या त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरून स्पष्ट झाले. त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात दोन शासकीय बैठकांचे आयोजन करण्यात आले होते, परंतु वेळेअभावी बैठकांना उपस्थित न राहता त्या रद्द करून रावते पक्षाच्या मेळाव्याला गेले. मात्र, त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना अडीच तास ताटकळत बसावे लागले. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते बुधवारी रात्री उशिरा कोल्हापुरात मुक्कामास आले. गुरुवारी सकाळी दहा वाजता भुयेवाडी येथे ग्रामपंचायत इमारत व नळपाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन समारंभ होता. त्यास ते उपस्थित राहणार होते. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत सकाळी साडेअकरा वाजता आढावा बैठक व दुपारी साडेबारा वाजता एस. टी.संदर्भातील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार होती. या बैठका आटोपून ते शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार होते.सकाळी भुयेवाडी येथील दहा वाजताचा कार्यक्रम साडेअकरा वाजता सुरू झाला. तो संपण्यास दुपारचा एक वाजला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक व एस. टी.संदर्भातील बैठक अचानक रद्द केली. मात्र, या बैठकीसाठी सकाळी अकरा वाजल्यापासून अधिकारी, आरटीओ, महानगरपालिका, एस. टी. महामंडळाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना बैठका रद्द केल्याचा निरोप देण्यात आला. जर दोन बैठकींना उपस्थिती लावली असती तर दुपारचे भोजन घेऊन मेळाव्याला जाणे शक्य होणार नाही, म्हणून बैठकाच रद्द करण्याचा निर्णय मंत्र्यांनी घेतला. रावते यांच्या या पक्षहिताला प्राधान्य देण्यामुळे अधिकाऱ्यांना मात्र ताटकळत राहावे लागले. रावते यांचा दौरा ठरल्यापासून अधिकारी टिप्पणी तयार करीत होते, परंतु त्यांच्या तयारीवर पाणी फिरले.
सरकारी कामापेक्षा पक्ष महत्त्वाचा
By admin | Published: February 06, 2015 12:59 AM