लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : कूर - कोनवडे दरम्यानच्या रस्त्यावर जितान ओढ्यावरील मोरीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने भर रस्त्यात धोकादायक खड्डे पडले आहेत. धोकादायक खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
कोल्हापूर - गारगोटी या मार्गाला समांतर जाणाऱ्या कूर ते आकुर्डे, शेणगाव या रस्त्यावर जास्त वर्दळ असते. विशेष म्हणजे या मोरीशेजारी कोनवडे येथून येताना उतरती असल्याने वाहने वेगाने खाली येत असतात . तसेच कूरकडून येताना या मोहरीपासून शंभर ते दोनशे फुटांवर मोठे वळण आहे. या दोन्ही बाजूने येताना वाहनधारकांना या मोरीवरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अनेक वाहनधारकांना किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी कोनवडेकडून येताना या मोहरीवर एका महिलेला खड्ड्यांमुळे गाडीवरून तोल जाऊन गंभीर दुखापत झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी वाहनधारकांच्या तक्रारीवरून संबंधितांनी मोरीवरील पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्याचा केवळ फार्स करण्यात आला होतो. पुन्हा काही दिवसांत खुड्ड्यांची जैसे थे अवस्था आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी संबंधित विभागाने मोरीवरील खड्ड्यांचा अडथळा दूर करावा व अपूर्ण काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
चौकट -
मोरीच्या कामाला एक वर्ष होत आले तरी अपूर्ण कामामुळे एखादा अपघात होऊन जीवित हानी होण्याची वाट पाहण्यापेक्षा लवकरात लवकर बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करून अपूर्ण काम पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. - संतोष पाटील (कोनवडे)
फोटो ओळ -
कोनवडे - कूर दरम्यानच्या मोरीच्या अर्धवट कामामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. (छाया - कैवल्य देसाई)
१८ कूर कोनवडे रस्ता