कोल्हापूर - मुसळधार पावसामुळे बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांसह एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर हे प्रवाशी आज एका विशेष ट्रेनने कोल्हापुरात पोहोचले.
वांगणी स्थानकांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती. प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर, दिवसभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर जवळपास 1 हजार प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. या प्रवाशांना बदलापूर येथे नेण्यात आले, तेथून त्यांना त्यांच्या घरांकडे रवाना करता येईल, असे सांगण्यात आले होते. ज्या प्रवाशांना कोल्हापूरला जायचे आहे, अशा प्रवाशांसाठी कल्याण येथून विशेष ट्रेन सोडण्यात आली. या विशेष ट्रेनमधून कोल्हापूरसाठी रवाना झालेले प्रवासी आज सायंकाळी कोल्हापूरला पोहोचले. यावेळी रेल्वे स्थानकावर भावूक वातावरण पाहायला मिळाले. आपल्या नातेवाईकांच्या काळजीत पडलेले कुटुंबीयांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. तर नातेवाईकांसोबत 'जादू की झप्पी' घेताना कित्येक प्रवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान कासगावजवळ महालक्ष्मी एक्सप्रेस थांबवण्यात आली होती. एक्स्प्रेस जवळ चार ते पाच फूट पाणी साचल्याने ही एक्सप्रेस काजगावजवळील रेल्वे रुळावर उभी करण्यात आली. रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले होते. तसेच प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या होत्या. एनडीआरएफ जवान आणि हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने प्रवाशांची सुटका करण्यात आली. अखेर रेल्वेतून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.