कोल्हापूर : कोरोना विषाणूंच्या (व्हायरस ) पार्श्वभूमीवर एस.टी.ने देखील खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून, प्रवाशांनी घाबरून जाऊ नये; परंतु योग्य ती दक्षता घेऊन प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केले आहे.मंत्री परब यांनी एस.टी. प्रशासनाला निर्देश दिले आहेत, त्यानुसार राज्यातील प्रमुख शहरांतील गर्दीच्या बसस्थानकांवरील बैठक व्यवस्था दररोज दिवसातून दोन-तीन वेळा सॅनिटायझरचा योग्य वापर करून स्वच्छ केली जावी. तसेच बसस्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक केला जावा.
वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना, सॅनिटरी लिक्विडची बाटली देण्यात यावी. प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांनी ती उपलब्ध करावी. याबरोबरच आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस सॅनिटरी द्रवमिश्रित पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी.
बसस्थानकावरील उद्घोषणा यंत्रणेद्वारे वेळोवेळी करोना विषाणूंच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. अशा प्रकारे करोना विषाणूंचा (व्हायरस) फैलाव रोखण्यासाठी एस.टी. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून, प्रवाशांनी घाबरून न जाता, योग्य ती दक्षता घेऊन प्रवास करावा, असे आवाहन मंत्री परब यांनी केले आहे.