कोल्हापूर : पासपोर्ट मिळण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा व मारावे लागणारे हेलपाटे कमी करण्यासाठी पासपोर्ट देण्याच्या प्रक्रियेमध्ये तीन महत्त्वाचे बदल करण्यात आल्याने लोकांना पासपोर्ट मिळणे अधिक सुलभ झाले आहे. पुण्यातील पासपोर्ट विभागीय कार्यालयाचे अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी ही माहिती दिली. पुणे कार्यालय पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठी आहे. सरासरी वर्षाला या कार्यालयातून पावणेतीन लाख लोकांना पासपोर्ट दिले जातात.पासपोर्टची सध्याची प्रक्रिया व बदल असे...1पासपोर्टसाठी सध्या पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रत्येकी दीड हजार रुपये शुल्क भरावे लागते. त्यानंतर पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आॅनलाईनच तारीख निश्चित करून दिली जाते. ही प्रक्रिया ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या सूत्रानुसार राबविली जाते. अडचण अशी होती की जी तारीख दिली जाईल त्याचदिवशी पुण्यास जाणे बंधनकारक असे. त्यादिवशी अडचण असेल तर नव्याने प्रक्रिया राबवावी लागे; परंतु आता त्याऐवजी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुम्हाला एकाऐवजी पाच दिवसांचा पर्याय दिला जाईल. त्यापैकी कोणतीही एक तारीख तुम्ही निश्चित करून जाऊ शकाल.2पासपोर्टसाठी पोलीस खात्यांकडून जी चारित्र्य व गुन्हेविषयक पडताळणी केली जाते ही सगळी प्रक्रिया पोलीस कागदपत्रांच्या आधारे आतापर्यंत करत होते; परंतु आता परराष्ट्र व्यवहार विषयक मंत्रालयाने त्यासाठी खास मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. त्यामुळे ही सगळी माहिती या अॅपवर भरली जाणार असल्याने पोलीस पडताळणीचा दाखला लवकर मिळण्यास सोयीचे झाले आहे.3प्रचलित पद्धतीनुसार पोलीस चारित्र्य पडताळणीचा दाखला जमा झाल्याशिवाय पासपोर्ट दिला जात नाही. यामध्ये आता महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ज्यांनी पासपोर्टसाठी अर्ज केला आहे, त्यांचे आधारकार्ड, भारत निवडणूक आयोगाने दिलेले निवडणूक कार्ड आणि पॅनकार्ड असेल तर त्याच्या अधीन राहून पासपोर्ट दिला जाणार आहे. सद्य:स्थितीत पोलीस पडताळणीसाठी किमान २१ ते ४० दिवस लागतात. आता हा कालावधी कमी होणार आहे; परंतु त्यासाठी तुम्हाला आॅनलाईन फॉरमॅटमध्ये प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल. पोलीस पडताळणीचा दाखला मुदतीत न दिल्यास मात्र तुमचा पासपोर्ट जप्त करण्यात येईल.
पासपोर्ट मिळणे आता सुलभ--- गुड न्यूज
By admin | Published: January 28, 2016 12:42 AM