कोल्हापूर : बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने साईनाथ स्पोर्टसचा ४-० असा एकतर्फी; प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)ने नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबवर १-० असा निसटता विजय मिळवीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश केला.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत पाटाकडील (अ)ने साईनाथ स्पोर्टसवर ४-० अशी मात केली. प्रारंभापासून ‘पाटाकडील’चेच वर्चस्व राहिले. ऋषिकेश मेथे-पाटील, वृषभ ढेरे, ओंकार जाधव, ओंकार वैभव जाधव, आदींच्या बहारदार खेळीपुढे ‘साईनाथ’चा टिकाव लागला नाही. चौथ्या मिनिटाला ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटीलने पहिल्या गोलची नोंद करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर ‘साईनाथ’कडून सतीश खोत, आशितोष मंडलिक, अक्षय मुळे, नितीन तानवडे, जय कामत यांनी चांगला खेळ करीत आघाडी वाढविण्यापासून रोखले. उत्तरार्धात ४८ मिनिटास पुन्हा हृषिकेश मेथे-पाटीलने गोल करीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६४ व्या मिनिटाला मिळालेल्या पासवर वृषभ ढेरेने गोल करीत ही आघाडी ३-० अशी वाढविली.
त्यानंतर ६८ व्या मिनिटाला पुन्हा हृषिकेश मेथे-पाटीलने गोल करीत वैयक्तिक तिसरा व संघाचा चौथा गोल नोंदविला. हीच गोलसंख्या कायम ठेवत सामना ४-० असा एकतर्फी जिंकत साखळी फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ‘सामनावीर’ म्हणून हृषिकेश मेथे-पाटील (पाटाकडील), तर लढवय्या खेळाडू अश्विन टाकळकर (साईनाथ) यांना गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबने बलाढ्य प्रॅक्टिस क्लब (अ)ला चांगलेच झुंजविले. यात कैलास पाटील, राहुल पाटील, सागर चिले, माणिक पाटील, सुशील सावंत, इडाची फ्रॉन्सिस, आदी दिग्गजांना अनेक वेळा गोल करण्याची संधी मिळाल्या. मात्र, मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा गोलरक्षक हणमंत गोंजारे याने उत्कृष्ट गोलरक्षण करीत सर्वांची वाहवा मिळवली. यासह आकाश माळी, सचिन पाडळकर, नीलेश खापरे, शिवम पोवार यांनी चांगला खेळ केला. मिळालेल्या कॉर्नर किकवर इंद्रजित चौगुलेने थेट गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. याच एकमेव गोलवर प्रॅक्टिस क्लबने सामना जिंकला ‘सामनावीर’ म्हणून इंद्रजित चौगुले, तर लढवय्या म्हणून हणमंत गोंजारे यांना गौरविण्यात आले.