इचलकरंजी : नगरपालिकेच्या सत्तेत सर्वच पक्षांचा सहभाग आणि विरोधी पक्षाचे अस्तित्वच नाही, अशी स्थिती असली तरी पालिकेच्या कामकाजाबाबत गोंधळाचीच स्थिती आहे. राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शहर विकास आघाडी अशा घटक पक्षांचा नगरपालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना पाठिंबा दिलेल्या ‘शविआ’त नाराजी आणि राष्ट्रीय कॉँग्रेस सत्तेत असूनही आक्रमक, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीचा फायदा प्रशासन उचलताना दिसत आहे.दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेवर असताना ‘शविआ’ प्रभावीपणे विरोधी पक्षाची भूमिका वटवत असे. मात्र, ‘शविआ’ने नगराध्यक्षा बिरंजे यांच्या बंडाला पाठिंबा दिला. आगामी निवडणुकीला सामोरे जाताना सध्याच्या सत्तेचा लोकांची कामे करण्यासाठी उपयोग करावा, असा ‘शविआ’चा व्होरा होता. त्यानंतर लोकांना नागरी सेवा-सुविधा देण्यात अडसर नसावा, यासाठी कॉँग्रेसनेही नगराध्यक्षा बिरंजे यांना सहकार्य देण्याचे ठरविले.मात्र, ‘शविआ’च्या नगरसेवकांची कामे होत नसल्याने ‘शविआ’मध्ये नाराजी पसरली. इकडे कॉँग्रेसनेही या संधीचा फायदा उठवत पालिका सभागृहात आक्रमक धोरण अवलंबले. शहराच्या पाणीटंचाईवर प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, ‘सबका साथ, सबका विकास’ असे धोरण अवलंबणारे सर्व पक्षातील काही बेरक्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात विविध कामे करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी पालिकेची आर्थिक कुवतसुद्धा पाहिली जात नाही. या गोंधळाच्या स्थितीचा फायदा प्रशासनाकडून उपटला जात आहे. अशा पार्श्वभूमीवर पालिकेत गटातटाच्या राजकारणाचा बोलबाला आहे. कॉँग्रेसमध्ये डाळ्या गट असल्याचे बोलले जात असतानाच खुद्द सतीश डाळ्या यांनी कॉँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचा इन्कार केला; पण राष्ट्रवादीमध्ये मात्र जांभळे व कारंडे गटाचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. याच बरोबरीने ‘शविआ’मध्ये सुद्धा काही गट कार्यरत असल्याचे सांगितले जाते. अशा रितीने पक्षात व आघाडीत समन्वय नसल्याने काहीसा संभ्रम अद्यापही आणि त्यातून निर्माण होणारी नाराजी खदखदत आहे. (प्रतिनिधी)कॉँग्रेसची बैठक रद्दबैठकीला तिघे अनुपस्थित, मात्र बैठक रद्द अशा परिस्थितीत शुक्रवारी येथील कॉँग्रेस भवनमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेसच्या नगरसेवकांची एक विशेष बैठक आयोजित केली होती. नगरपालिकेमध्ये गेल्या दोन-तीन आठवड्यांत घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या बैठकीला विशेष महत्त्व होते. कॉँग्रेसकडे असलेल्या एकूण २९ नगरसेवकांपैकी २६ नगरसेवक या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी दिली. या बैठकीस नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यासह संजय तेलनाडे व चंद्रकांत शेळके हे तिघे अनुपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले; पण या बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे येऊ न शकल्याने ही बैठकच रद्द झाली. ही बैठक आता मंगळवारी-बुधवारी होण्याची शक्यता आहे.
पालिकेतील गोंधळ प्रशासनाच्या पथ्यावर
By admin | Published: June 05, 2015 11:56 PM