कोल्हापूर : हलगी, घुमक्याच्या ठेक्यात आणि बारा बलुतेदारांनासोबत येऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवारी धैर्यशील माने यांनी शुक्रवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.पालकमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजित पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.दुपारी १ नंतर आदित्य कॉनर्रवरून मिरवणुकीने माने यांच्यासह सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्यासाठी निघाले. भगव्या आरामबसमधून अनेक कार्यकर्ते आधीच दाखल झाले होते. तर माने, मंत्री पाटील, आमदार क्षीरसागर, उल्हास पाटील,सुजित मिणचेकर हे ज्या ट्रॅक्टरमधून आले त्यामध्ये बारा बलुतेदार आपल्या पारंपरिक वेशभुषेसह आणि व्यवसयाच्या प्रतिकांसोबत बसले होते.दुपारी पाऊणच्या सुमारास मंत्री रावते, खोत, आमदार हाळवणकर, विजय देवणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येऊन थांबले. यानंतर निवेदिता माने, शौमिका महाडिक, माने यांच्या पत्नी वेदांतिका, सत्वशील माने, निहारिका माने यादेखील १00 मीटरच्या बाहेर येऊन थांबल्या.यानंतर निवडक नेतेमंडळीना आत सोडण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडे यावेळी माने यांनी दोन अर्ज दाखल केले. एका अर्जावर संजय शिंदे रा. शिरोळ आणि दुसऱ्या अर्जावर संताजीराव जाधव माने यांच्या सूचक म्हणून सह्या आहेत.