लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील कुडाळकर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लुबाडणूक सुरू असल्याचा आरोप वडगाव नगर परिषदेचे नगरसेवक संदीप पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. हॉस्पिटलच्या विरोधात दहा तक्रारी आल्या असून, आरोग्य यंत्रणाही डॉ. कुडाळकर यांना पाठीशी घालत असल्याचे त्यांनी सांगितले.
नावली (ता. पन्हाळा) येथील जयसिंग जाधव यांच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले. कुडाळकर हॉस्पिटलने कधी ३० हजार, कधी ५० हजार रुपये असे ३ लाख ७० हजार रुपये जमा करुन घेतले. पैसे वेळेत जमा न केल्यास रुग्णाचा ऑक्सिजन काढून टाकण्याची धमकी दिल्याने जाधव यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुर्देवाने तिथे त्यांचा मृत्यू झाला. भेंडवडे (ता. हातकणंगले) येथील अतुल शांताराम कसबेकर हे कोरोना उपचारासाठी दहा दिवस दाखल होते. एक दिवस अतिदक्षता विभागात, तर उर्वरित दिवस जनरल वॉर्डात उपचार सुरू होते. या कालावधीत तीन सलाईन व इंजेक्शन दिले, याचे बिल १ लाख ३९ हजार २७८ रुपये करण्यात आले. पेठ वडगाव येथील हालीमा महम्मद पटेल यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असतानाही त्यांच्याकडून १ लाख ७० हजार बिल आकारणी केली. असे अनेक रुग्णांची हॉस्पिटलने लुबाडणूक केली आहे. याबाबत वडगाव नगर परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, तरी दखल घेतली नाही. या रुग्णालयाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी संदीप पाटील यांनी केली.
याबाबत कुडाळकर हॉस्पिटलचे डॉ. सूरज कुडाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.