कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग जसा फोफावत आहे, तसा उन्हाळ्यातील सूर्य आग ओकत आहे. एकीकडे कोविडची लागण झाल्याची मनातील भीती, तर दुसरीकडे वातावरणातील प्रचंड उष्म्याचा त्रास असा दुहेरी सामना कोविड केअर केंद्रातील रुग्णांना करावा लागत आहे. उष्म्यामुळे दिवसभर हैराण झालेल्या रुग्णांची रात्रीची झोपही उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तापमान वाढले आहे. अशा स्थितीत सीपीआर, आयजीएम, आयसोलेशन, कोविड रुग्णालये, उप जिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना उष्म्याचा त्रास होऊ लागला आहे. सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयात सर्व ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा नाही. फक्त जेथे अतिदक्षता विभाग आहे, व्हेंटिलेटर्स आहेत, तेथेच केवळ वातानुकूलित यंत्रणा आहे. अन्य ठिकाणी रुग्णांना पंख्याचाच आधार आहे. शेवटी पंख्याची हवादेखील गरम येते.
सीपीआर, आयजीएम, आयसोलेशन रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाला तर तत्काळ जनरेटर सुरू केले जातात. काही कोविड सेंटरमध्येही जनरेटरची सोय आहे. परंतु, ग्रामीण भागात बहुतांशी ठिकाणी मात्र अशी व्यवस्था नाही. ती करणेही प्रशासनाला शक्य नाही. लाईट गेली तर मात्र रुग्णांना प्रचंड त्रास होतो. कोविड रुग्णांना पुरेशी विश्रांती आवश्यक असते. परंतु, उष्म्यामुळे त्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
- पॉईंटर्स- - जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर्स - १४
- कोविड रुग्णालय - सीपीआर आणि आयजीएम इचलकरंजी, आयसोलेशन
- उपजिल्हा रुग्णालय -गडहिंग्लज ग्रामीण रुग्णालय
- दाखल पॉझिटिव्ह - १५२५
उष्म्याने रुग्ण हैराण -
काेल्हापुरातील कोविड रुग्णालयात ज्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आहेत, तेथे वातानुकूलित यंत्रणा आहे. कोविड केअर सेंटरमध्ये तशी व्यवस्था नाही. केवळ पंखे बसविण्यात आले आहेत. काही ठिकाणी पंखेही नाहीत. त्यामुळे काेरोना रुग्ण उष्म्याने हैराण झाले आहेत.
३९ अंश सेल्सिअसपर्यंत आपमान स्थीर-
मार्च महिन्यात कडाक्याच्या उष्म्यामुळे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोओचले होेते. त्यावेळी कोविड केअर सेंटर सुरू व्हायची होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्ण वाढायला सुरुवात झाली. सध्या तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यात आणखी वाढ होऊन या महिन्याअखेरपर्यंत ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत स्थीर राहण्याची आहे.
दोन रुग्णांच्या प्रतिक्रिया-
पहिला रुग्ण -
कोविड केअर सेंटरमध्ये केवळ पंखे आहेत. दिवसभर प्रचंड उष्मा असतो, त्यामुळे झोप लागत नाही. खोलीत फॅन असले तरी हवा गरमच येते. त्यामुळे जीव कासावीस होतो. कोरोनाशी लढता लढता या उष्म्याचाही सामना करावा लागत आहे.
दुसरा रुग्ण -
कोणतीच लक्षणे नसली की रुग्णाला सीपीआर, आयसोलेशन ऐवजी कोविड केअर सेंटला दाखल करण्यात येते. कोविडचा कसलाही त्रास होत नाही; पण प्रचंड उष्म्याच्या दिवसांतील कोविड कक्षातील वास्तव्य जास्त त्रासदायक वाटते.