कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील डोंगरभागात वसलेल्या वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना जलदूत प्रकल्पांतर्गत फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात आली.डोंगरात वसलेल्या या वाड्या आरोग्याच्या सुविधेपासून अनेक वर्षे वंचित आहेत, याचा विचार करून तारळे येथील काका आठवले वसतिगृहाच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले. राधानगरी तालुक्यातील डिगेवाडी, मिसाळवाडी, जोंधळेवाडी, दळवेवाडी या वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.पडळी गावामध्ये या आरोग्य शिबिरास प्रारंभ झाला. सेवा भारतीच्या इचलकरंजी येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून डॉ. बाळकृष्ण हौसिंग, डॉ. अभिजित मुसळे व त्याचे सहकारी यांनी सांधेदुखी, त्वचाविकार, डोळ्यांचे आजार, उच्च रक्तदाब, ताप, खोकला, इत्यादी आजारांवर उपचार केले. या शिबिरामध्ये ६ महिन्यांपासून ते ९० वर्षांपर्यंतच्या १५३ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.याशिवाय जलदूत प्रकल्पांतर्गत वाड्यावस्त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि लोकसहभागातून त्यांची उत्तरे शोधण्यासाठी पडळी गावाचा पी. आर. ए. अर्थात मुल्यावलोकन करण्यात येत आहे. या शिबिरासाठी वसतिगृहाचे व्यवस्थापक श्रीकांत वष्ट, जलदूत प्रवीण जोंधळेकर, तसेच शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागातील विद्यार्थी विशाल बुधवले, नागेश पवार यांनी प्रयत्न केले.