गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने आपत्कालीन काळात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी २०१४ मध्ये १०८ नंबरची रुग्णवाहिका सेवा सुरू केली. त्यामुळे दुर्गम, डोंगराळ तसेच अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळू लागल्या. त्यामुळे हजारो रुग्णांना जीवदान मिळाले; पण ३८ लाख लोकसंख्येच्या कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ३६ रुग्णवाहिका आहेत.जिल्ह्यात ही सेवा सुरू होऊन शनिवारी म्हणजे प्रजासत्ताकदिनी पाच वर्षे पूर्ण झाली. जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांनी २६ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत एक लाख ३१ हजार रुग्णांना सेवा दिली.रस्त्यांवरील अपघात, मारामारी, प्रसूती, विजेचा धक्का, मोठे अपघात, गंभीर दुखापत, हृदयाचे आजार, भाजणे, विषबाधा या प्रमुख रुग्णांसह सर्व प्रकारच्या रुग्णांना आपत्कालीन काळात ही वैद्यकीय सेवा १०८ रुग्णवाहिका देते. २६ जानेवारी २०१४ ला जिल्ह्यात ही सेवा सुरू झाली. पहिल्यांदा ३४ रुग्णवाहिका, त्यानंतर गडहिंग्लज व नरसोबावाडी येथे दोन रुग्णवाहिका देऊन ती संख्या ३६ वर पोहोचली. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे ३८ लाख होती. त्यानंतर या आठ वर्षांत लोकसंख्येत वाढ होऊन रुग्णसंख्याही वाढली आहे. कोल्हापूर शहरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे प्रत्येकी एक, इचलकरंजीत दोन; तर ग्रामीण भागात म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी ३२ रुग्णवाहिका असून, एकूण ३६ रुग्णवाहिका आहेत. यात बेसिक लाईफ सपोर्ट व अॅडव्हान्स सपोर्ट लाईफच्या रुग्णवाहिका आहेत. साधारणत: एक ते सव्वा लाख लोकसंख्येला एक रुग्णवाहिका असे गणित आहे. सध्या शहराची लोकसंख्या जवळपास साडेसहा लाख आहे. शहरात आणखी दोन १०८च्या रुग्णवाहिका वाढवाव्यात, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांसह शहरवासीयांमधून होत आहे.समितीवर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रणमहाराष्ट्र शासन व भारत विकास ग्रुप इंडिया लि.तर्फे (बी.व्ही.जी.) १०८ नंबर रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्यात दोन प्रशासकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, आरोग्य अधिकारी, आदी सदस्य आहेत.
रुग्ण वाढले; मात्र रुग्णवाहिकांचा तुटवडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:38 AM