कोल्हापूर : मालती पाटील क्रिकेट अकॅडमीने भिडे स्पोर्टसचा, तर फायटर्स क्लबने एम. जी. स्पोर्टसचा पराभव करीत प्रा. संजय देसाई स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.
शाहू स्टेडियमवर गुरुवारी सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यांत मालती पाटील क्रिकेट संघाने भिडे स्पोर्टसचा ४१ धावांनी मात केली. फलंदाजी करताना पाटील संघाकडून प्रथमेश बाजारीने ४२, प्रतीक कदमने नाबाद ३६ धावा केल्या. भिडे स्पोर्टसकडून मिहीर देवपुजे, राजू मुल्ला, स्वप्नील नाईक, यश पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना भिडे स्पोर्टसला हे आव्हान पेलवले नाही. यात शुभम मगदूमने ३२ धावांची एकाकी झुंज दिली. पाटील संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. यात बाजरीने तीन, तर अभिषेक निषाद, प्रतीक कदम यांनी दोन व तुषार पाटील, करण सांगावकर यांनी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला. दुसऱ्या सामन्यांत फायटर्सने एम. जी. स्पोर्टसवर मात केली. फायटर्सने २० षटकांत ६ बाद १४३ धावा केल्या. यात शुभम मेढेने नाबाद ५४, भास्कर भोसलेने २८ धावांचे योगदान दिले. गोलंदाजी करताना एम. जी. संघाकडून जयराम आरमाकर व जितू डेलानी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना एम. जी. संघाला २० षटकांत ७ बाद १३५ धावांत संपल्यामुळे हा सामना फायटर्सने जिंकला. यात रितिक बासवानी याने ४७ व कैलास हसिजा याने २८ धावांची झुंज दिली. मात्र, ते संघाचा पराभव वाचवू शकले नाहीत. फायटर्सकडून तुषार असोळे, अमित शेटके यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.