कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत खऱ्या अर्थाने महाडिक विरुद्ध पाटील असाच सामना रंगणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर महापालिकेवर सत्ता असणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे दोघांकडूनही साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब होण्याची शक्यता आहे.कोल्हापूर महापालिकेची १५ नोव्हेंबरला मुदत संपत आहे. राज्यात कोरोना असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सध्यातरी या निवडणुकीसंदर्भात पुढील प्रक्रिया जाहीर केलेली नाही. शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी कार्यक्रम जाहीर करू शकते. जाणकारांच्या अंदाजानुसार जानेवारीपासून महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीविषयी चर्चा रंगू लागली आहे.महाडिक, पाटील यांच्यात होणार चुरसआगामी विधानपरिषद निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य ज्याच्याकडे जास्त असणार, त्याचा विजय निश्चित होणार आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये ८१ पैकी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी महाडिक, पाटील यांच्यात चुरस पाहण्यास मिळणार आहे.महापालिका, विधानपरिषदेसाठी प्रतिष्ठा पणाला लागणारविधान परिषदेच्या गतवर्षीच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात सामना रंगला होता. आगामी निवडणुकीत उमेदवार कोण असणार अद्यापि स्पष्ट नाही. तरी मागील पराभवाची सल महाडिक कार्यकर्त्यांमध्ये अजूनही आहे. त्यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीमध्ये होते. आता ते भाजप उपप्रदेशाध्यक्ष आहेत, तर सतेज पाटील काँग्रेसचे जिल्ह्याचे नेतृत्व करतात. त्यामुळे महाडिक, पाटील या दोघांसाठीही महापालिकेची आणि विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.नवमतदार ठरणार निर्णायक२०१५ च्या निवडणुकीनंतर नवीन मतदारांची मोठ्या संख्येने नोंद झाली आहे. प्रभाग बदलणार नसले तरी तेथील मतदार संख्या वाढणार आहे. हे नवे मतदारच प्रभागाचे नगरसेवक ठरवणार आहेत.पक्षाचा एकला चलोचा नाराभाजप आणि ताराराणी आघाडी एकत्र निवडणूक लढणार हे निश्चित आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना यांचा एकला चलोचा नारा आहे. पक्षात इच्छुक नाराज होऊ नयेत, बंडखोरी होऊ नये म्हणून त्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. मात्र, एकमेकांच्या विरोधात उमेदवार देताना सेटलमेंट होण्याची दाट शक्यता आहे. ज्या पक्षाचे प्राबल्य जास्त त्या प्रभागात दुसरा पक्ष तेथे कमी ताकदीचा उमेदवार देण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणूक- महाडिक विरुद्ध पाटील पुन्हा रंगणार सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 10:42 AM
MuncipaltyCarporation, Election, kolhapur, Mahadevrao Mahadik, Satej Gyanadeo Patil महापालिकेच्या आगामी निवडणुकीत खऱ्या अर्थाने महाडिक विरुद्ध पाटील असाच सामना रंगणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर महापालिकेवर सत्ता असणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे दोघांकडूनही साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे दोन्हीकडून टोकाच्या संघर्षाची शक्यता साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब होणार