सदाशिव मोरेआजरा : आजरा तालुक्यातील लिंगवाडी येथे मंगळवारी दुपारच्या वेळेत पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची माहिती येथील शेतकऱ्याने दिली, परंतु वनविभागाने मात्र तो भेकर असल्याचा दावा केला आहे.आजरा तालुक्यातील लिंगवाडी जवळील कोंढाचा ओहोळ नावाच्या शेतात प्रकाश प्रभू हे गुरे चारण्यासाठी गेले असता अचानक त्यांच्यासमोर पट्टेरी वाघ दिसल्याने त्यांनी घाबरुन पळ काढला.यापूर्वी लिंगवाडी, किटवडे, अंबाडे, वझरे, सुळेरान परिसरात वारंवार पट्टेरी वाघाचे दर्शन झाले होते. चार वर्षांपूर्वी प्राणी गणनेसाठी लावलेल्या कॅमेºयामध्ये ब्लॅक पँथरही दिसला आहे. लिंगवाडी परिसरात वाघ, हत्ती, गवे, भेकर, रानडुक्कर यांचा अधिवास आहे.दरम्यान, शेतकऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर तत्काळ वनविभागाने शोध मोहिम सुरु केली आहे. या वाघाच्या पावलांचे ठसे किंवा विष्ठा शोधण्यासाठी मंगळवारी सकाळपासून वनविभागाचे वनपाल सुरेश गुरव यांच्यासह १५ जणांचे पथक जंगलात फिरत आहेत. त्यांनी जवळपासचा ३५ हेक्टरचा परिसर पिंजून काढला, परंतु हा वाघ असल्याचा कोणताही माग मिळालेला नाही.
हा प्राणी भेकर असावा असा दावा वनविभागाने केला आहे. या परिसरात रानडुक्कर तसेच गव्याचे पावलांचे ठसे आढळून आल्याचे आजरा वनविभागाचे वनक्षेत्रपाल संदेश पाटील यांनी सांगितले.नुकत्याच जाहीर झालेल्या वाघांच्या गणनेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ असल्याचे जाहीर केले आहे. कर्नाटकातील दांडेलीपासून राधानगरी अभयारण्यापर्र्यतचा कॉरिडॉर हा वाघाच्या भ्रमंतीचा असल्यामुळे कदाचीत या परिसरात वाघ आला असल्याचा अंदाज वन विभागाने केला आहे.घाबरुन जाउ नये : वनविभागाचे आवाहनराधानगरी अभयारण्यात अनेकदा वाघ दिसलेले आहेत. वाघाचा हा कॉरिडॉर असल्यामुळे या परिसरात वाघ दिसू शकतो. परंतु हा त्याचा नेहमीचा फिरण्याचा मार्ग असल्यामुळे लोकांनी, शेतकऱ्यांनी किंवा स्थानिक रहिवाश्यांनी घाबरुन जाउ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.