कोल्हापूर - गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत आहे. हा पक्ष अनेक घटकांना उचकावण्याचा प्रयत्न करत आहे पण ते घटक उचकत नसल्यानेच शरद पवार यांना नैराश्य आल्याची टीका महसूल मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. पवार यांनी पंतप्रधानांच्या अनुषंगाने केलेली टीका चुकीची असून त्यांनी या पदाचा प्रतिष्ठा जपावी, अशीही अपेक्षा मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.पुण्यात रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत पवार यांनी बोचरी टीका केली होती. त्यास चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘पवार यांनी स्वत: मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व उंचीने मोठे असणाऱ्या व्यक्तीने अशी टीका करणे योग्य नाही. भाजपला प्रत्येक निवडणुकीत यश मिळत आहे. सातत्याने मिळणाºया अपयशामधून पवार यांनी नैराशेपोटी मोदी यांच्यावर टीका केली आहे. निवडणुका आल्या की राष्ट्रवादी काँग्रेसला जात आठवते. निवडणुकीच्या राजकारणासाठी जातीयवाद निर्माण करणे योग्य नाही.पाटील म्हणाले, ‘केंद्र व राज्यात आतापर्यंत काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही? आता त्यांना त्याची तीव्रता वाटू लागली आहे. आम्ही न्यायालयात मराठा आरक्षण प्रश्नी ताकदीने लढत आहेत.भुजबळ आणि आरोप..भुजबळ यांनी पुण्यात भाजपावर टीका केली होती. भुजबळ हे दोन वर्षे कारागृहात होते. तपास यंत्रणेला तथ्य आढळल्यानेच ते कारागृहात होते. त्यांचे आरोप सिद्ध व्हायचे आहेत. त्यांचा जामीन झाला आहे ते चांगलेच आहे, ते निर्दोष झाले तर अधिक चांगले, असाही टोला पाटील यांनी लगावला.
सततच्या पराभवाने पवारांना नैराश्य - चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 6:37 AM