काेल्हापूर : राज्य शासनाने स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंगळवारी अखेर मान्यता दिली आहे. गेले वर्षभर विविध कारणांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. डिसेंबर २०२० अखेर मुदतवाढ संपल्यानंतर सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, राज्य शासनाने १६ जानेवारी २०२१ ला पुन्हा मार्च २०२१ पर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या. याबाबत काही संस्थांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे शासनाने स्थगित प्रक्रिया पुन्हा सुरू केली असून, कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
९५ नगर परिषदा, नगरपंचायतींसाठी १५ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या मुंबई : विविध जिल्ह्यांमधील ९५ नगर परिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, तसेच इतर विविध ३१ नगर परिषदा, नगरपंचायतींमधील ३५ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी येथे दिली.नवी मुंबई, वसई-विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, तसेच इतर विविध १६ महानगरपालिकांतील २५ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहितीही मदान यांनी दिली.याशिवाय, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ११ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असेही मदान यांनी सांगितले.