गेले महिनाभर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. सुरुवातीस लोकांनी लस घेण्याकडे कानाडोळा केला. मात्र जसजशी जनजागृती होईल, तसतसा लोकांचा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ओढा वाढला. मात्र लसींचा तुटवडा असल्याने एक दिवस लसीकरण, दोन दिवस बंद अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राकडील गर्दी वाढून लोकांच्या लांबच्या लांब रांगा लागू लागल्या आहेत.
लोक उन्हात उभी राहिलेले पाहून रविवारी ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्राच्या आवारात मंडप उभा केला. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व बैठकीसाठीची सोय केली आहे. सरपंच विजया जाधव, उपसरपंच अंबर बनगे, ग्रामपंचायत सदस्य यांनी तरुणवर्गाला सोबत घेऊन रविवारी सकाळी या सोई केल्या. याबाबत गावातील ज्येष्ठ मंडळींकडून ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.
लोकांचा लस घेण्याकडील कल वाढल्याने वेळेत सेवा देता यावी यासाठी आरोग्य केंद्राच्या वतीने वेळेचे बंधन न ठेवता व सुट्टीदिवशीही लसीकरण चालूच ठेवले आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी आर. ए. बोरगावे, जिनेश्वरी माणगावे, आरोग्य साहाय्यक आर. ए. तऱ्हाळ, औषध निर्माता रावसाहेब कारदगे, आरोग्य साहाय्यिका रोहिणी स्वामी, आशा गटप्रवर्तक राधिका घाटगे, दीपाली भोसले यांच्यासह आशा स्वयंसेविकाही काम करीत आहेत.