कोल्हापूर : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एका नातवासाठी माढ्यातून माघार घेतली. परंतु आता दुसरा नातू उठून बसला असुन आजोबा माझे काय? असे म्हणत आहे. त्यामुळे या नातवांमुळे पवार आजोबांची चांगलीच पंचाईत झाल्याचा टोला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे लगावला.शाहू मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण हॉल येथे शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, मुंबईच्या माजी महापौर श्रध्दा जाधव, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, महिला जिल्हाध्यक्षा शुभांगी पोवार आदींची होती.
कोल्हापूरातील शाहू मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉल येथे मंगळवारी आयोजित शिवसेनेच्या गटप्रमुख मेळाव्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी, गटप्रमुख उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव)मंत्री रावते म्हणाले, राजकारणातील दोस्तीच्या इतके आहारी आपण गेलेलो असतो की ती सोडवत नाही. आई वडीलांनी हाक मारली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण या दोस्तीत गुंतलेलो असतो. परंतु या दोस्तीमुळे राजकीय अडचणी निर्माण होतात. हे पक्षासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जनतेचा विश्वास संपादन करावा यश आपोआप तुमच्या मागे येर्ईल, असे आवाहन रावते यांनी येथे केले.
येणारा काळ हा पुन्हा शिवसेना-भाजपचा असेल अशी स्थिती सद्या आहे. प्रत्येक शिवसैनिकाने दहा घरात प्रचार केल्यास उमेदवार निवडून येण्यास काहीच अडचण नाही. प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाची पताका फडकविण्यासाठी शिवसैनिकांनो सज्ज व्हा.
यावेळी दुधवडकर, संजय पवार, आ. नरके , आ. आबिटकर, संजय घाटगे यांची भाषणे झाली, ते म्हणाले, उच्चांकी मतदान देऊन संजय मंडलिकांना निवडून आणून ‘मातोश्री’वर नेऊ. एक शिवसैनिक म्हणून पक्षाच्या आदेशाने काम करु. यावेळी रवी चौगुले, मनजित माने, वीरेंद्र मंडलिक, संग्राम कुपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, कमलाकर जगदाळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.क्षीरसागर, इंगवले अनुपस्थितशिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर व शहरप्रमुख रविकिरण इंगवले हे अनुपस्थित होते. या दोघांच्या अनुपस्थितीबाबत मेळाव्याच्या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात कुजबूज सुरु होती. हे दोघे जाणीवपूर्वक आले नाहीत की अन्य कामात व्यस्त असल्याने ते येऊ शकले नाहीत. हे न कळाल्याने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.साटेलोटे करणाऱ्यांचा शोध घ्यागेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते कुणामुळे व कुठे गेली याचा शोध घेऊन साटेलोटे करणाऱ्यांची माहिती घेण्याची गरज आहे. दोषींना शिक्षा व्हायलाच पाहीजे, तरच संघटना टिकेल, असे संजय पवार यांनी सांगितले.
कोल्हापूर म्हणजे ‘मंडलिक’कोल्हापर म्हणजे मंडलिक अशी ओळख स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला होती. सत्ताधारी पक्षाचे मंत्री व खासदार असतानाही एखादी गोष्ट अयोग्य असली तर प्रसंगी स्वपक्षियांशीच संघर्षाची भूमिका त्यांनी घेतल्याचे रावते यांनी सांगितले. यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.