कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी थेट काहीच सूतोवाच केले नाही; परंतु माझ्या मनात काय असते, ते माझ्या पक्षाच्या लोकांना चांगले कळते, असे विधान करून त्यांनी राजकीय गुगली टाकून दिली. त्यामुळे संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत आमदार हसन मुश्रीफ जे बोलतात, त्याला पवार यांचे पाठबळ आहे का, अशी चर्चा शनिवारी झालेल्या दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर रंगली. शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंडलिक हे गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते व या निवडणुकीतही ते आमचे खासदारकीचे उमेदवार असतील, असे जाहीर करून टाकले.
या कार्यक्रमास जाण्यापूर्वी पवार यांनी पंचशील हॉटेलवर खासदार धनंजय महाडिक यांच्याशीही चर्चा केली व आज, रविवारी ते त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठीही जाणार आहेत. त्यामुळे पवार यांच्या मनातलं काय कळत नाही, असे म्हटले जाते, याचे प्रत्यंतर पुन्हा आले. मंडलिक पुरस्कार वितरण सोहळा हा सामाजिक कार्यक्रम असला तरी त्यामध्ये संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचे ब्रॅँडिंग हा एक उद्देश होताच. त्यामुळे त्या दृष्टीनेही राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते; परंतु त्याबाबत फारशी स्पष्टता झाली नाही.
प्रास्ताविकात मंडलिक यांनी पवार व सदाशिवराव मंडलिक यांचे ऋणानुबंध किती व कसे होते याची आठवण करून दिलीे. आमदार हसन मुश्रीफ यांनी मात्र मंडलिक यांच्या उमेदवारीस थेट तोंड फोडले व दिवंगत मंडलिक यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंमत द्यावी, असे आवाहन केले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक हे चांगले काम करीत असल्याचे सांगून व्यासपीठावरील नेत्यांनी त्यांना पाठबळ द्यावे असे सांगितले.
शाहू छत्रपती यांच्याही भाषणात तसा अप्रत्यक्ष उल्लेख झाला. त्यामुळे पवार काय बोलतात याबद्दलची उत्कंठा ताणली होती; परंतु त्यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या अनुभवानुसार कोणतेच स्पष्ट संकेत दिले नाहीत. माझी राजकीय लाईन क्लिअर असते, असे सांगून त्यांनी पुन्हा गोंधळच उडवून दिला.मुश्रीफ यांच्या डोळ्यांत अश्रू...शरद पवार आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यात राजकीय विसंवाद निर्माण व्हायला मी स्वत:च कारणीभूत होतो, अशी नि:संदिग्ध कबुली देऊन हसन मुश्रीफ यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्यांना अश्रूही आवरता आले नाहीत. डबडबलेल्या डोळ्यांनी आणि कातरलेल्या आवाजातच त्यांनी भाषण केले.मंडलिक यांच्या चार विधानसभा आणि चार लोकसभा निवडणुकीतील प्रचारात ‘सरसेनापती’ म्हणून काम करण्याचे सौभाग्य मला लाभले, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, ‘काही कारणांनी माझे मंडलिक यांच्याशी मतभेद झाले; पण जेव्हा मंडलिकसाहेब रुग्णालयात दाखल झाले तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी मला बघून ते म्हणाले, ‘हसन, आपल्यातील मतभेदांमुळे आपलं फार मोठं नुकसान झालं.’ पुढे दोन महिन्यांनी त्यांचे निधन झाले. आज मी जो उभा आहे, तो पवार आणि मंडलिक यांच्यामुळे. पुढच्या काळात त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत द्यावी, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.’महाडिक वगळून सर्वया पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मंडलिक यांनी सर्वपक्षीय झाडून साºया नेत्यांना बोलावून राजकीय शक्तिप्रदर्शन केले. महाडिक कुटुंबीय वगळून जिल्ह्यातील सर्व आजी-माजी नेते या समारंभास व्यासपीठावर उपस्थित होते.दोघेच खरे कारभारीया समारंभात व्यासपीठावरील नियोजनाची सगळी जबाबदारी आमदार मुश्रीफ व सतेज पाटील यांनी पाहिली. हे दोघे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे एकत्र बसले होते. त्यांच्यात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.