कोल्हापूर : शहरांतर्गत विकासकामावर थेटपणे परिणाम करणाऱ्या तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत असणाºया अनेक विषयांकडे प्रशासन पुरेशा गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिला.भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रलंबित नागरी समस्यांबाबत आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. दोन वर्षांपासून अनेक विषयांमध्ये चुकीचे, बेकायदेशीर, भ्रष्टाचारी पध्दतीने काम सुरू आहे. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयात मनपा प्रशासन लक्षपूर्वक आणि सचोटीने काम करताना दिसत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून महानगरपालिकेची आणि कोल्हापूरची ही अवस्था बिकट झाली आहे, याकडे शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले.
तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा चिकोडे यांनी दिला. थेट पाईपलाईन संदर्भात येत्या ७ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल जनतेला जाहीर करू, असे आयुक्तांनी सांगितले. चर्चेमध्ये विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, विजय जाधव, विजयसिंह खाडे-पाटील, हेमंत आराध्ये यांनी भाग घेतला.यावेळी किरण नकाते, दिलीप मेत्राणी, सुभाष रामुगडे, गणेश देसाई, मारुती भागोजी, विवेक कुलकर्णी, भरत काळे, प्रग्नेश हमलाई, अक्षय निरोखेकर, तानाजी निकम उपस्थित होते.