गडहिंग्लज :
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच गडहिंग्लज शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यात गडहिंग्लज तालुका हा कोरोनाचा टॉप हॉटस्पॉट बनला आहे. त्यातच शहरात डेंग्यूचे रूग्ण वाढत आहेत. वाढती अस्वच्छता व दुर्गंधीमुळेच डेंग्यूच्या साथीला निमंत्रण मिळत आहे. त्याला प्रशासनाचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असणाऱ्या या प्रश्नांसंदर्भात चर्चेसाठी लोकप्रतिनिधी, संबंधित विभाग व नगरपालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात, नगरसेवक हारूण सय्यद, दीपक कुराडे, उदय जोशी, किरण कदम, सुरेश कोळकी, डॉ. किरण खोराटे, सिद्धार्थ बन्ने, महेश सलवादे, गुंड्या पाटील, राजू जमादार यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे राष्ट्रवादीतर्फे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उदय जोशी, हारूण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, महेश सलवादे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रमांक : २१०६२०२१-गड-०४