कोल्हापूर : या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील लढतीकडे सर्वाधिक लक्षवेधी म्हणून लढत पाहिले जात आहे. भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.
मतदानासाठी तीन दिवस उरले असल्याने गाव आणि प्रभागातील महाडिक गट आणि आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हालचाली, घडामोडींवरील लक्ष वाढविले आहे. या दोन्ही गटांच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या जोडण्यांनी वेग घेतला आहे.यंदाची निवडणूक महाडिक आणि पाटील गटांसाठी त्यांच्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदारपणे तयारी सुरू आहे. सन २०१४ च्या विधानसभा आणि यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील ज्या-ज्या प्रभागांमध्ये आपल्याला कमी मतदान मिळाले आहे, त्या ठिकाणी ते वाढविण्यासाठी या दोन्ही गटांच्या नेत्यांकडून निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून जोडण्या लावणे सुरू होते. त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आले.
ग्रामीण आणि शहरी भागांतील एकमेकांचे कार्यकर्ते, गटांना फोडण्यावरही या नेत्यांनी भर दिला आहे. गाव आणि शहरी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या ईर्ष्येने प्रचारात उतरले आहेत. गल्ली, कॉलनी आणि प्रभागात होणाऱ्या एकमेकांच्या हालचाली, घडामोडींवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. आपल्या गटाकडील एखाद्या व्यक्तीशी विरोधकांमधील कुणी संपर्क साधला, तर त्या व्यक्तीशी तातडीने संपर्क साधून माहिती घेण्याचे, आपल्या गटाची आणि उमेदवाराची भूमिका पटवून देण्याचे काम कार्यकर्त्यांकडून सुरू आहे.
दिवसा ‘जोर’, रात्री ‘बैठका’आपापल्या परिसरात पदयात्रा, प्रचारफेरी, व्यक्तिगत संपर्क आणि कॉर्नर सभांद्वारे कार्यकर्त्यांनी प्रचाराचा जोर वाढविला आहे. दुसऱ्या दिवशीच्या प्रचाराचे नियोजन आणि जोडण्या करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून रात्री प्रभागनिहाय बैठका घेण्यात येत आहेत.