कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापुरातील दोन्ही जागा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक हालचालींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कसलीही गडबड होणार नाही याकरीता दक्ष रहा. काही दुरूस्त्या करायच्या असतील तर त्या जरूर करा, पण गाफील राहू नका, अशा स्पष्ट सूचना राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील नेत्यांना बुधवारी सकाळी दिल्या.
पवार मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यांनी अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर सायंकाळी कॉँग्रेस, राष्टÑवादी, स्वाभिमानी संघटना व पक्ष,आरपीआय आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मार्गदर्शन केले. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता हेलिकॉप्टरने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रयाण केले.तत्पूर्वी येथील एका हॉटेलवर पवार यांनी जिल्ह्यातील राष्टवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्योगपती व्ही. बी. पाटील, आदिल फरास, अनिल साळोखे अशा निवडक नेत्यांशी निवडणूक प्रचार यंत्रणा आणि तयारीसंबंधी अर्धा तास चर्चा केली. कोल्हापूरच्या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणीही गाफील राहू नका. अजूनही काही दुरूस्त्या कराव्या लागत असतील तर त्या करा. ज्या कामात माझे सहकार्य लागेल त्यासंबंधी मला सांगा मी लक्ष देतो, असे पवार यांनी सांगितले. १२ एप्रिलला आपण पुन्हा कोल्हापूर दौºयावर येत असून त्या दिवशीच्या सभांचे नियोजन करण्याची जबाबदारी मुश्रीफ व महाडिक यांच्यावर त्यांनी सोपविली.
ही चर्चा सुरू असता तेथे आजºयाहून जयवंत शिंपी, मुकुंदराव देसाई पोहोचले. पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पंधरा मिनिटांच्या चर्चेत पवार यांनी त्यांना काही सूचना केल्या. पाठोपाठ माजी आमदार दिनकरराव जाधव व त्यांचे पुत्र सत्यजित जाधव पोहोचले. त्यांच्याशीही पवार यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. यावेळी मुश्रीफ, महाडिक उपस्थित होते. हॉटेलमधून खाली आल्यानंतर पवार यांना भेटायला आलेल्या उपमहाराष्ट केसरी मल्ल अमृता भोसले व काही पैलवानांची ओळख महाडिक यांनी करून दिली. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना प्रचारकार्यात सहभागी व्हा, असे आवाहन पवार यांनी केले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरने सोलापूरकडे जाण्याकरीता उड्डाण घेतले. कोल्हापूर दौºयावर आलेल्या राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची बुधवारी सकाळी माजी आमदार दिनकरराव जाधव व त्यांचे पुत्र सत्यजित जाधव यांनी भेट घेतली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)