कोल्हापूर : येथील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी बुधवारी दिली. जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दि. १२ डिसेंबर २००० च्या शासन निर्णयाद्वारे एक आगाऊ वेतनवाढ दिली जात होती. परंतु सहाव्या वेतन आयोगातील शिफारशीचा चुकीचा अर्थ लावून घेऊन जिल्हा प्रशासनाने २००६ नंतरच्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढ देण्याच्या लाभापासून वंचित ठेवले होते. याविरोधात पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील सुतार आणि अन्य ८७ शिक्षकांनी ॲड. सुरेश पाकळे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते सुनील सुतार यांच्यासह अन्य ८७ जणांना मागील फरकासह एक आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत. सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्या शिक्षकांचा, एक आगाऊ वेतनवाढ आणि फरक मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती भरत रसाळे यांनी दिली.
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:23 AM