कोल्हापूर : हिंद केसरी,महाराष्ट्र केसरीसह राज्यातील सर्व वृद्ध खेळाडूंना प्रतिमहिना मिळणारे मानधन रक्कम वाढवून ती नियमित द्यावी. गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तत्काळ द्यावे अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली.हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरी व अन्य खेळातील वृद्ध खेळाडूंना मिळणारे मानधन अत्यल्प आहे. कोरोना काळात ते गेल्या आठ महिन्यांपासून थकीत आहे. ते नियमितपणे द्यावे. अशी मागणी आमदार पाटील यांनी क्रीडा मंत्री केदार यांची भेट घेऊन केली. महाराष्ट्र व हिंद केसरी मल्लांना प्रतिमहिना सहा, तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना चार आणि राष्ट्रीय खेळाडूंना अडीच हजार मानधन दिले.
हे अत्यल्प आहे. त्यामुळे ते वाढवून त्वरित द्यावे. गेल्या जुलै २०२० पासून मानधन या ज्येष्ठ खेळाडूंना मिळालेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांनी क्रीडा मंत्री केदार यांची बुधवारी दुपारी भेट घेतली. हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन क्रीडामंत्री केदार यांनी आमदार पाटील यांना दिले.