लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगातील पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची रक्कम मुदतीत द्यावी, अशी मागणी नगर परिषद सर्व कामगार संघटना कृती समितीने नगराध्यक्ष अलका स्वामी व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार १ जानेवारी २०१६पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात १ सप्टेंबर २०१९पासून वेतनातून दिला गेला आहे. याबाबत १ जानेवारी २०१६पासून कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या रकमेप्रमाणे फरकाची पत्रके करणे आवश्यक आहे. या संदर्भात शासन निर्णय झाला असून, त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हा शासन निर्णय सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता देण्याबाबतचा असल्याने अद्याप नगरपालिकेकडून पहिला हप्ताही मिळालेला नाही. भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी; अन्यथा १ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.