गांधीनगर :
गांधीनगर बाजारपेठेतील सुमारे पंधरा हजारांवर कामगारांसह वाहनचालकांना लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण वेतन मिळावे, राज्य शासनाने त्यांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त वाय. एम. हुंबे यांच्याकडे केली. तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात गांधीनगरातील दुकाने बंद असल्याने कामगारांवर वेतनाअभावी आर्थिक संकट कोसळले. कामगारांच्या कुटुंबीयांना उपासमारीची वेळ आली. त्यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक पॅकेज द्यावे व व्यापाऱ्यांनी कामगारांना सर्व वेतन द्यावे. वाहनचालकांनाही जीव धोक्यात घालून सेवा बजावल्याने त्यांनाही वेतन मिळावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
कामगार अधिकारी हुंबे यांनी गांधीनगर होलसेल व रिटेल व्यापारी असोसिएशनशी चर्चा करून यावर तोडगा काढू, असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी दक्षिण मतदारसंघ संघटक अवधूत साळोखे, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे, गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत, बाळासाहेब नलवडे, विभागप्रमुख दीपक पोपटाणी, शाखाप्रमुख दीपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी, अजित चव्हाण, शिवाजी सांगावकर आदी उपस्थित होते.
फोटो : २१ गांधीनगर निवेदन
गांधीनगरातील कामगारांना लॉकडाऊन काळातील वेतन द्या अशी मागणी करवीर शिवसेनेच्या वतीने सहा. कामगार आयुक्त वाय.एम. हुंबे यांच्याकडे करण्यात आली.