कोल्हापूर : आगामी हंगामात एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा घाट साखर कारखान्यांनी घातला असून, ते कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिला. त्याचबरोबर मागील हंगामातील थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह देण्याची मागणीही त्यांनी केली.आंदोलन अंकुश, जय शिवराय किसान मोर्चा व बळीराजा शेतकरी संघटना यांनी सोमवारी साखर आयुक्त गायकवाड यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. कायद्यानुसार उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे; पण कारखानदारांनी कायद्याला बगल देत तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा घाट घातला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येणार असून, ते कदापि खपवून घेणार नाहीत.तोडणी-वाहतूक, पंधरवडा एफआरपी अहवालात व्याजाची रक्कम देणे बंधनकारक आहे. याबाबतही चर्चा झाली. यावेळी धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, बी. जी. पाटील, मनोज राजगिरे, दत्तात्रय जगदाळे, विकास शेसवरे, सुनील चोपडे, आदी उपस्थित होते.