समाजात अनेक प्रकारची दुखणी, अडचणी, समस्या असतात. सर्वसामान्य जनतेला त्याला सामोरे जावे लागते. ज्यांचे मासिक उत्पन्न अगदीच कमी आहे, जिथे दोन वेळच्या खाण्याची अडचण आहे, अशा कुटुंबातील लोकांना तर भयंकर अडचणींना सामोरे जावे लागत असते. समाजात दिवसेंदिवस आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे. एकीकडे प्रचंड धनसंपत्ती असून, ती खर्च कशी करायची असा प्रश्न असतो, तर दुसरीकडे खिशात पैसे नाहीत पण भूक लागलेली आहे, आता काय करायचं, कसं जगायचं, अशा प्रश्नांनी ग्रासलेली कुटुंबेही आहेत. अशा कुटुंबांचा प्राधान्यक्रम असतो तो केवळ खाण्याचा! त्यानंतर कपडेलत्ता, शिक्षण, आरोग्य, घर याला प्राधान्यक्रम दिला जातो. खाणं-पिणं आणि जगणं हाच त्यांचा प्राधान्याचा विषय असतो. मुलांचं शिक्षण, कुटुंबाचं आरोग्य या गोष्टींना त्यांच्या जीवनात फारसे महत्त्व असत नाही. त्यांच्याकडे दुसरा, तिसरा पर्याय असत नाही. सगळा दुष्काळ अशा गरीब, दरिद्री कुटुंबावरच ओढवलेला असतो. अनेक ठिकाणी मी पाहतोय. अनेक गरीब कुटुंबं लाचारीनंच जगतात. एका गावातील जागृत दर्ग्यात जाण्याचा मला योग आला. दर्शन झाल्यानंतर जेव्हा आम्ही मित्र बाहेर पडलो, तर एका साध्या हॉटेलच्या दारात ४०-५० गरीब लोक बसलेले दिसले. एकाच्याही अंगात बऱ्यापैकी कपडेही नव्हते. ते असे का बसले आहेत हे जेव्हा आम्हाला कळलं, त्यावेळी खूपच वाईट वाटलं. कोणी तरी दानशूर येईल आणि आपणाला ‘खाणा’ देईल, अशी त्यांची भावना होती. रिकाम्या पोटी बसलेल्या या लोकांच्या नजरा लाचारांप्रमाणे दानशूरांचा वेध घेत होत्या. अनेकजण पुढे निघून गेले; पण माझा व माझ्या मित्राचा पाय काही पुढे पडायला तयार नाही. आम्ही त्या हॉटेलात शिरलो. गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीला या बाया-बापड्यांना राईस प्लेट द्या, अशी विनंती केली. आमची विनंती ऐकता महिला, वृद्ध पुरुष, मुलं असे सगळे जण पटक न हॉटेलमध्ये शिरले. जागा पकडल्या. अन त्या सर्वांनी जेवण केले. त्या सर्वांचं बिल आम्ही दोघांनी भागविलं आणि तेथून बाहेर पडलो. माझं मन अतिशय विषन्न झालं. मनात एकच विषय घोळत राहिला, की परमेश्वराच्याच दारात या लोकांवर अशी अवस्था का यावी? एक मन असं म्हणत होतं की, परमेश्वरानेच आपल्याला पाठविले असावे; पण काहीही असो, जे काही आम्ही पाहिलं, अनुभवलं, ते फारच वेदनादायी होतं. समाजात अनेक गरजू लोक आहेत, जे दानशूरांच्या मदतीवर जगत असतात. माझे एक मित्र आहेत. त्यांनी ‘अवनि’च्या शाळेतील मुलांना दररोज लागणारा भाजीपाला, चटणी, तांदूळ, आदी देण्याचा उपक्रम राबविला आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही. अशाच प्रकारचा उपक्रम येथील एक सामाजिक संस्था करीत आहे. ज्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे., रोजगार करू शकत नाहीत, अशा शे-दीडशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात आहेत. प्रत्येक महिन्याला ठरलेला किराण माल, अन्नधान्य त्यांच्या घरात पोहोच केले जाते. आणखी एका नगरसेवक मित्राच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. एके दिवशी त्याने शाहूवाडी तालुक्यातील एका प्रमुख गावातील आठवडी बाजारात फेरफटका मारला आणि निरीक्षण केले. अत्यंत दुर्गम भागातून खरेदीला आलेल्या अनेक बाया-बापड्यांच्या तसेच लहान मुलांच्या पायात चपला नसल्याचे मित्राच्या लक्षात आले. पुढच्या आठवडी बाजारावेळी हा मित्र टेंपो भरून तीनशे-चारशे चपलांचे जोड घेऊन तेथे गेला. ज्याच्या पायात चप्पल नाही, त्यांना हात जोडून नमस्कार करीत त्यांच्या पायात चपलं घातली. त्यावेळी लोकांच्या चेहऱ्यावरील आनंदात मित्राच्या वेदना विरून गेल्या. समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत. समाजात दानशूर आहेत, म्हणून गरजवंतांच्या गरजा पूर्ण होत आहेत. कोणाला शिक्षणाची, कोणाला औषधोपचाराची सुविधा मिळतेय, तर कोणाला कपडे मिळत आहेत. देणारे आहेत म्हणूनच गोरगरिबांच्या जीवनात आनंद मिळतो. हाच आनंद घेणाऱ्यांसह देणाऱ्यांनाही खूप समाधान देऊन जातो. - भारत चव्हाण
देणाऱ्याने देत जावे..
By admin | Published: March 13, 2017 11:18 PM