पट्टणकोडोली हे २८ हजार लोकसंख्येचे हातकणंगले तालुक्यातील मोठे गाव आहे. हुपरी, रेंदाळ, तळंदगे, इंगळी, पट्टणकोडोली या पाच गावांसाठी म्हणून जुनी अडीच लाख लिटरची पेयजल याेजना आहे. पट्टणकोडोली वगळता उर्वरित चार गावांनी स्वतंत्र योजना केल्या आहेत. या योजनेचे दीड कोटीचे वीज बिल थकीत असल्याने महावितरणकडून वारंवार फ्यूज काढण्याची कारवाई केली जाते. या सर्वांना कंटाळून पट्टणकोडोली ग्रामपंचायतीने पेयजल योजनेतून सहा कोटी तीन लाख रकमेची पेयजल योजना राबविण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये मुख्य ठेकेदार नलवडे यांनी कामाचा नारळ फोडला; पण त्यांनी स्वत: न करता उपठेकेदार हर्षवर्धन माने यांच्याकडून काम करवून घेण्यास सुरुवात केली.
अडीच लाख लिटरची एक आणि ७० हजार लिटरच्या तीन अशा एकूण चार टाक्या बांधण्याचे नियोजन करून १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा घालून देण्यात आली. टाकीऐवजी गावांतर्गत लाईन टाकण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले. गावातील रस्त्यांची खुदाई झाली; पण कामाने गती घेतली नाही, म्हणून २०१८ मध्ये गावात जनआंदोलन उभारले गेले. तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोर ठेकेदाराने तीन महिन्यांत योजना पूर्ण करून देतो, असे लिहून दिले; पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही. दरम्यान, अपूर्ण योजनेमुळे गळती आणि उकरलेले रस्ते, ग्रामपंचायतीला दुरुस्तीचा सोसावा लागलेला भुर्दंड आणि आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने लोकांमध्ये असलेला राग वाढतच जाऊन अखेर त्याची परिणती तीव्र आंदोलनात झाली आहे.
चौकट ०१
...तरीही एमबीला मान्यता
या योजनेंतर्गत अजून पंपहाऊस, साठवणूक टाकी, फिल्टर हाऊस यापैकी कोणतेही काम झालेले नाही. आतापर्यंत या विषयावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सात वेळा आढावा बैठकी झाल्या, ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करूनदेखील कारवाई करण्याऐवजी पाणीपुरवठा विभागाने दोनच महिन्यांपुर्वी एक कोटी २० लाखांची एमबी मान्यता दिली आहे. साडेतीन किलोमीटरचेही काम झालेले नसताना १२ किलोमीटर काम झाल्याचे दाखवून आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांची बिले ठेकेदाराला देण्यात आली आहेत.
प्रतिक्रिया
ठेकेदार बदलावा, गुन्हा दाखल करावा, राष्ट्रीय पेयजलऐवजी ती जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण करावी, अशी मागणी करूनदेखील जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सर्वांचे लागेबांधे असल्यानेच ही वेळ आली आहे.
- अंबर बनगे, ग्रामपंचायत सदस्य, पट्टणकोडोली