आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0२ : कर्जमाफीचे ३४ हजार कोटी रुपये बँकांना अदा करण्यासाठी शासन हप्ते पाडून घेणार आहे, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे आणखी काही हजार कोटी रुपये वाढले तरी चालतील परंतु प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाले, शासनाने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र, शासनाची एकूण आर्थिक अवस्था पाहता शासन बँकांना हप्ते पाडूनच निधी देणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीचा एक ठराव केला जाईल आणि येत्या पाच वर्षांत टप्प्या-टप्प्याने आम्ही हे पैसे बँकांना अदा करू, अशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल, अशी माझी माहिती आहे. जर पाच वर्षांचे हप्ते पाडणारच असाल तर आणखी काही कोटी रुपये वाढले म्हणून शासनाने वाईट वाटून घेण्याची गरज नाही; परंतु प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक रकमेवर किमान ५० हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. सध्या कर्जफेडीच्या २५ टक्के अनुदान अशा परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे; परंतु ही रक्कम अतिशय तुटपुंजी आहे म्हणूनच ही रक्कम वाढवून ती ५० हजार करावी, अशी आमची मागणी आहे. एकूणच कर्जमाफीमध्ये सरकार गोंधळलेले असल्याने अनेक त्रुटी राहिल्या आहेत. शासनाने या कर्जमाफीमुळे विविध विकास प्रकल्पांच्या निधींना कात्री लावण्याचा एकीकडे निर्णय घेतला असताना खरोखरंच शासन जर हप्ते पाडून बँकांना रक्कम देणार असेल तर बँकाही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
२०१९ च्या पुढचे हप्ते आम्ही फेडू
आता जरी शासनाने हप्ते पाडले तरी २०१९ नंतर आमचेच सरकार येणार असल्याने आम्ही पुढचे हप्ते फेडू, असा आशावादही यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केला.