काटेभोगाव गावापासून नदीचे पात्र दूर अंतरावर आहे. यामुळे सिंचनाअभावी या गावची जमीन सर्वाधिक कोरडवाहू आहे. पावसाळा संपल्यानंतर रब्बी पिके व जनावरांना पाण्याची सोय हा पाझर तलाव बांधण्यात आला होता, पण या पाझर तलावाला मोठी गळती असल्याने त्याच्यात पाणी साठवण होत नसे. हा तलाव मृदू व जलसंधारण विभागाकडे वर्ग केल्याने डागडुजीसाठी ५६ लाख ६७ हजार निधी मंजूर करण्यात आला.
यामध्ये भरावावरील झाडे काढून साफ सफाई करण्यात आले व पाया खुदाई करून कामाला सुरुवात करण्यात आली. यानंतर या तलावाच्या जुन्या भरावावर ३० से.मी.चा मातीचा थर, त्यावर ५०० मायक्रॉनचा कागद टाकून पुन्हा ३० सेंमी मुरमाचा थर टाकून त्यावर दगडी पिचिंग(अश्मपटल) करणे अशा कामाचा अंतर्भाव आहे. हे काम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुर्ण झाले. पण पहिल्याच पावसाने तलावाचे दगडी पिंचिंग, मुरम तलावात घसरून आले आहे. पावसाने दगड, मुरूम घसरून आल्याने तो गाळाने भरून गेला आहे. आता हा तलावात कोरडा पडला आहे. यामुळे लाखो रुपये खर्च झाले, पण याचा शेतकऱ्यांना पाण्यासाठी फायदा होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
विधानसभेत तारांकित प्रश्न --
या तलावाच्या निकृष्ट कामाबाबत लोकमतने प्रथम आवाज उठवला होता. यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी केली. पावसाळ्यात या तलावाच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले. पावसाळ्यानंतर पुन्हा याची डागडुजी करू, असे आश्वासन दिले होते, पण कोणतीच हालचाल नाही. सुरू असलेल्या विधानसभेत आ. पी. एन. पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे.
कोट...
पावसाळ्यापूर्वी या तलावाचे काम झाले आहे. भराव घसरल्याने माती, दगड व मुरमाने तलाव गाळाने भरला आहे. यामुळे या कामाचा निकृष्टपणा स्पष्ट झाला आहे. याशिवाय शेतीला याचा कोणताच उपयोग होणार नसल्याने सरकारचा निधी वाया जाणार आहे.
तानाजी जरग शेतकरी काटेभोगाव
(फोटो)
काटेभोगाव, ता. पन्हाळा येथे पाझर तलावाचा नुकताच करण्यात आलेला दगडी पिचिंग व मुरमाचा भराव पहिल्या पावसातच घसरले होते. कागद उघडा पडला आहे. गळतीमुळे फेब्रुवारीमध्ये पाझर तलाव कोरडा पडू लागला आहे.