कोल्हापूर : रस्त्यावरून जाणारी एक-दोन वाहने, चौकाचौकांमध्ये असलेला पोलीस बंदोबस्त, सुरू असलेली औषध दुकाने, ठिकठिकाणी साफसफाई, निर्जंतुकीकरणाचे काम करणारे महापालिकेचे कर्मचारी असे चित्र मंगळवारी कोल्हापूर शहरात पाहायला मिळाले. कोरोनाला रोखण्यासाठी कोल्हापूरकरांनी स्वयंशिस्त पाळल्याने बिगेन लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहराने शांतता अनुभवली. रस्ते, चौकांमध्ये सूनसान वातावरण होते.ग्रामीण भागाबरोबरच शहरातही सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसागणिक बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दुसऱ्यांदा लागू केलेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी साथ दिली आहे. त्यांना स्वयंस्फूर्ती आणि शिस्तीने एकप्रकारे स्वत:ला होम क्वॉरंटाइन करून घेतले आहे. व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दुकाने, बाजारपेठाही बंद असल्याने कडकडीत लॉकडाऊन सुरू आहे.
शहरात मंगळवारी राजारामपुरी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, महापलिका परिसर, शिवाजी चौक, दसरा चौक, शिवाजीपेठ, मिरजकर तिकटी, मंगळवारपेठ, आदी परिसरातील चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त होता. पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांकडे चौकशी केली जात होती. औषध दुकाने, जीवनावश्यक वस्तू विकणारी दुकानेच तेवढी सुरू होती.
पेट्रोलपंपदेखील चालू होते, मात्र तेथील लगबग, खरेदी अगदीच नगण्य होती. बाकी संपूर्ण कोल्हापूर शहर बंदच्या छायेत सामावल्याने सर्वत्र नीरव शांतता होती. अधूनमधून ही शांतता भेदत जाणारे एखादेच वाहन रस्त्यावर जाताना दिसत होते. तेवढाच काय तो आवाज होत होता. विविध ठिकाणी असलेली औषध दुकाने, जीवनावश्यक वस्तू विकणारी दुकाने सुरू राहिली.
पेट्रोलपंप सुरू होते, पण, त्याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांची संख्या नगण्य होती. शहर एकप्रकारे बंदच्या छायेत सामावले असून सर्वत्र शांतता दिसून आली. त्यातही शांतता भेदून जाणाऱ्या काही वाहनांचा आवाज येत होता. त्यात काही रूग्णवाहिकांचा देखील समावेश होता. मार्चनंतरच्या लॉकडाऊननंतर शहर सध्या पुन्हा एकदा मोकळा श्र्वास घेत आहे.