लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अहिंसा परमो धर्माचा जयघोष करत आणि पर्यावरण रक्षणाचा खास संदेश देत बहुसंख्य तरुण वर्गानी दुचाकी आणि सायकलद्वारे रविवारी निघालेल्या या शांतता रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदविला. समस्त जैन समाजातील श्वेतवस्त्रांकित महिला, तरुण आणि बालकांनी सायकलीवरुन शहरभर फेरी काढली. भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काढलेल्या या अहिंसा शांतता रॅलीचे आयोजन भगवान महावीर प्रतिष्ठान आणि समस्त जैन समाजामार्फत करण्यात आले होते.
महावीर गार्डन येथून नमोकार महामंत्र व भगवान महावीरांच्या प्रतिमेच्या पूजनाने सकाळी साडेसात वाजता भट्टारकरत्न डॉ. लक्ष्मीसेन महाराज यांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीत सायकल, दुचाकी आणि पायी चालणाऱ्या भाविकांनी भाग घेतला. श्वेतवस्त्रे परिधान केलेल्या महिला भाविक अग्रभागी होत्या. प्रारंभी डॉ. पी. एम. चौगुले आणि या अहिंसा शांतता रॅलीचे उद्घाटक संजय वसंतराव कोले यांच्या हस्ते अहिंसा शांतता ज्योत प्रज्वलित करण्यात आली. श्वेत वस्त्र परिधान केलेल्या श्रावक श्राविकांनी या रॅलीमध्ये भाग घेऊन शांततेचा संदेश उत्साहपूर्वक वातावरणात समाजापर्यंत पोहोचविला. रॅलीत कोल्हापुरातील सर्व दिगंबर आणि श्वेतांबर जैन मंदिरातील अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
महावीर उद्यानातून सकाळी साडेसात वाजता निघालेली ही रॅली किरण बंगला, दाभोळकर काॅर्नर, परीख पूल, शाहूपुरी, जैन मंदिर, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे मानस्तंभ मंदिर येथे विसर्जित झाली. याठिकाणी भगवान महावीरांचा अभिषेक, पूजा व आरती झाली. त्यानंतर अल्पोपहाराचे वाटप झाले.
‘महावीर भगवान की जय’, ‘जैन धर्म की जय’, ‘अहिंसा परमो: धर्म की जय..’असा जयघोष करत रथात फुलांनी सजवलेल्या रथात भगवान महावीरांची मूर्ती, ‘जगा आणि जगू द्या’चे संदेश देणारे फलक सायकलस्वारांनी लावले होते. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा आणि जगा आणि जगू द्याचा संदेश देणारे फलक हाती घेउन भाविक या रॅलीत सहभागी झाले होते.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. महावीर मिठारी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, भरत वणकुद्रे, संजय कोठावळे, डॉ. सुषमा रोटे, पापा चमकले, सुरेश रोटे यांच्यासह समाजातील श्रावक - श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री लहान आणि मोठ्या गटासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.