पन्हाळा : ऐतिहासिक व पर्यटनाचे ठिकाण असलेला पन्हाळा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. त्यातच पन्हाळ्यावर येणारा रस्त्याचा संपर्क तुटल्याने लहान व मोठ्या व्यावसायिकांमध्ये नैराश्याची भावना पसरली आहे. संपूर्ण गावात स्मशानशांतता अनुभवावयास मिळत आहे. २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पन्हाळा-बुधवारपेठ रस्ता ९०० मीटर खचला होता. त्यामुळे पन्हाळ्याचे पर्यटन अनेक दिवस थांबले होते. त्यानंतर कोरोना लॉकडाऊन सुरू झाला आणि पुन्हा हात थांबले. आता लॉकडाऊन संपतो न संपतो तोच पुन्हा त्याच कोरोनाच्या गर्तेत व्यवसाय अडकले आहेत. कोरोनाकाळात पन्हाळ्यावर ५०० रुग्णसंख्या आणि १५ मृत्यू झाले. यातून सावरत आता व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असताना मुख्य रस्ता खचला. मागील रस्ता दुरुस्तीचा अनुभव बघता व्यावसायिकांची मने देखील खचली आहेत. आता या रस्ता दुरुस्तीसाठी किमान सहा ते सात महिने जातील, अशी चर्चा व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. बहुतेक छोटे व्यावसायिक निराश झालेले दिसत आहेत.
पन्हाळ्याचा मुख्य रस्ता खचल्याने गावात शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:22 AM