निपाणी़ : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. ४९१ जागांसाठी १,२६१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता ३० रोजी येणार्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निपाणी तालुका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीची मतमोजणी निपाणी येथे होणार आहे. यामुळे तालुका प्रशासन, स्थानिक अधिकार्यांनी जोरदार तयारी केली होती. निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ६३ गावात रविवारी मतदान झाले.
सकाळपासूनच महिला व पुरुषांची मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्यास जागृती करण्यात येत होती. यासोबत अंगणवाडी सेविकांच्या वतीने प्रत्येक मतदाराची तपासणी करण्यात येत होती. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेली निवडणूक काळजीपूर्वक वातावरणात पार पडली.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली. यामुळे दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता निकालानंतर सर्व गोष्टी उलगडणार आहेत.
३० रोजी मतमोजणी
दिनांक ३० रोजी मतमोजणी होणार असून, यादिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. के. एल. इ. संस्थेच्या आवारात मतमोजणी होणार असून, प्रशासनाने तयारी केली आहे.