कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील झाडाला धडकल्याने आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी सकाळी मोराचा मृत्यू झाला. तंत्रज्ञान अधिविभागाच्या परिसरात ही घटना घडली. गेल्या दीड महिन्यात मोराचा मृत्यू होण्याचा दुसरा प्रकार विद्यापीठामध्ये घडला आहे.या तंत्रज्ञान अधिविभागाच्या परिसरात मोर मरून पडल्याचे मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या निर्दशनास आले. त्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने वन विभागाला दिली. त्यावर वन विभागाच्या करवीर परिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी आवश्यक माहिती घेऊन मृत झालेल्या मोराला शवविच्छेदनासाठी नेले.दरम्यान, तंत्रज्ञान अधिविभाग परिसरातील झुडपातून झेप घेतल्यानंतर तेथील एका झाडाला हा मोर धडकला. या धडकेने त्याला हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यामध्ये या मोराचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रथमदर्शनी अहवालातून दिसून आले आहे. पूर्ण वाढलेला हा मोर झाडाला धडकल्याचे चित्रण हे तंत्रज्ञान विभाग परिसरातील सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. त्याची आम्ही पाहणी केली. या परिसरातील झुडपाची उंची कमी करण्याची सूचना आम्ही विद्यापीठाला करणार असल्याचे करवीरचे वनपरिक्षेत्रपाल सुधीर सोनवले यांनी सांगितले.
गेल्या दीड महिन्यात मोराचा मृत्यू होण्याचा दुसरा प्रकार घडला आहे. असे प्रकार घडू नयेत आणि मोरांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या सूचना विचारात घेऊन विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल.-विलास नांदवडेकर, कुलसचिव.