गारगोटी : गारगोटीच्या कलामहोत्सवानिमित्त आयोजित रिंंगण सोहळा अलोट जनसागराच्या साक्षीने रविवारी संपन्न झाला. यावेळी ज्ञानेश्वर माउलीच्या गजराने परिसर दुमदुमला. महोत्सवामुळे पोलीस ग्राऊंड व बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप आले होते. ‘जो जे वांच्छिल सांस्कृतिक व्यासपीठ’ने कला महोत्सवाचे आयोजन केले असून, शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे.टाळ, मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांनी सुरुवातीपासूनच जोर धरला होता. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बाहेरूनही दिंड्या आलेल्या होत्या. अवेळी पडत असलेल्या पावसाने थोडी उसंत दिल्यानंतर तीन तासांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. इंजुबाई मंदिरापासून सुरुवात झालेली पालखी क्रांतीज्योत, बाजारपेठ, विठ्ठल मंदिर, जोतिबा देवालय, पाटगाव रोड, ग्रामीण रुग्णालय ते टेंबलाई मंदिर या मार्गावरून मार्गस्थ झाली. ग्रामीण रुग्णालय ते क्रांतीज्योत या बाजारपेठेत उभे रिंगण झाले. वारकरी सांप्रदायाने क्रांतीज्योतीस हार अर्पण केल्यानंतर पोलीस ग्राऊंडवर भव्य गोल रिंगण सोहळा झाला. गारगोटी ग्रामस्थ व परिसरातील भाविक महिलांनी आणलेली झुणका-भाकर, खिचडी, केळी इंजूबाई मंदिर येथे सर्वांनी खाऊन घेतला. उर्जितसिंह शितोळे सरकार अंकलीकर यांचे मानाचे घोडे, अश्वस्वार राजू हावलदार, युवराज कोळी, अक्षय परीट या रिंंगण सोहळ्यात सहभागी झाले. रिंगण सोहळ्याचे पूजन नामदेव पाटील, अश्वाचे पूजन ह.भ.प. एम. डी. देसाई, मुकुंद देसाई, तर पालखीपूजन रामभाऊ कळंबेकर, नारायण पाटील यांच्या हस्ते झाले. हा कलामहोत्सव ६ मार्चअखेर घेण्यात येणार असल्याचे जो जे वांच्छिल सांस्कृतिक व्यासपीठाचे प्रमुख एम. डी. रावण व सुभाष माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गारगोटीत कलामहोत्सवास प्रारंभ
By admin | Published: March 01, 2015 11:46 PM