कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांनी कोरोना लस तसेच कोरोना चाचणीही त्वरित घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा फेरीवाले कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
फेरीवाला कृती समितीची बैठक शिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून इस्टेट अधिकारी सचिन जाधव, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख पंडित पोवार यांनी उपस्थित राहून कोरोना काळात कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. जर नियमांचे पालन झाले नाही तर फेरीवाल्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कृती समितीचे निमंत्रक माजी महापाैर आर.के.पोवार, नंदकुमार वळंजू यांनी फेरीवाल्यांना घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन कराव, कोरोना लस तातडीने घ्यावी, चाचणी करून घ्यावी, तसेच त्याचा दाखल जवळ ठेवावा, असे आवाहन केले. जेथे गर्दी होईल त्याठिकाणी महापालिका पथकांनी त्वरित जाऊन तेथे फेरीवाल्यांची तपासणी करावी, फेरीवाल्यांचे त्यास सहकार्य राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बैठकीस रघुनाथ कांबळे, अशोक भंडारे, किशोर घाटगे, सुरेश जरग, किरण गवळी, रियाज कागदी, गणी बागवान, राजेंद्र महाडिक, अविनाश उरसाल, नितीन पाटील दिलीप खोत, नितीन सूर्यवंशी, लता डवरी, शेवंता जाधव, सुलोचना जाधव उपस्थित होते.