लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर / कळंबा: एस.टी. बसच्या धडकेत कबीर नामदेव शिंदे (वय २९, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) हा युवक जागीच ठार झाला. त्याचा मेहुणा ओंकार रंगराव पेंडुरकर (२२, रा. आळते, ता. हातकणंगले) हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कळंब्यापासून जवळच असलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला.
रात्री आठच्या सुमारास गारगोटी आगाराची ( एमएच एक्यू ६३०६) कोल्हापूर - मुरगूड बस कळंब्यातून बाहेर पडली. यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या वरील दोघांना या बसने उडवले. यातील कबीर याच्या मांडीवरून एस. टी.चे चाक गेल्याने अतिरक्तस्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ओंकार या अन्य गंभीर जखमी युवकाला १०८ रुग्णवाहिकेतून सुरुवातीला सीपीआरला नेण्यात आले; परंतु त्याच्या डोक्याला जोरात मार लागल्यामुळे त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मृत कबीर याच्या घरी आई, पत्नी आणि आठ वर्षांची मुलगी असते. तो इचलकरंजी येथे सायझिंगमध्ये काम करत होता असे सांगण्यात आले. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले.
बुटांवरून ओळखले
कबीर याचा मृतदेह बराच वेळ सीपीआरमध्ये पडून होता; परंतु त्याला ओळखणारे कोणीच नसल्याने नावही समजू शकत नव्हते. अशातच तारदाळला कबीरच्या घरी कोणीतरी फोन करून अपघात झाल्याचे सांगितले. कबीरच्या पत्नीने गल्लीतील मुलांना ही माहिती दिल्यानंतर तातडीने तिघे मित्र सीपीआरमध्ये आले. प्लास्टिकमधून बाहेर आलेले बूट पाहूनच त्यांतील एका मित्राने तो कबीरच असल्याचे ओळखले. आम्ही दोघांनी मिळून बूट घेतल्याचे सांगताना त्याला अश्रू अनावर झाले.