नसीम सनदी ।कोल्हापूर : कोरोना विषाणूपेक्षा कित्येक पटीने अधिक वेगाने पसरलेल्या अफवेने पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. लाखो रुपये गुंतवून लखपती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यावसायिकांवर अक्षरश: रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. कर्जाचा डोंगर फेडायचा कसा असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
बेरोजगारी आणि बेभरवशाच्या शेतीमुळे अनेक तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळले, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला; पण कोणताही विषाणू आला की त्याचा पहिला बळी पोल्ट्रीच पडत आहे. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू ही त्याचीच काही अलीकडची उदाहरणे आहेत. जिल्ह्यात ४५०० पोल्ट्रीधारक आहेत. महिन्याची उलाढाल १५ कोटींच्या घरात आहे. गेल्या १५ दिवसांपासून चिकन खाऊच नये असा अप्प्रचार झाल्याने चिकन विक्री आणि मागणी निम्म्यावर आली आहे. दर निम्म्याने कमी झाले आहेत, जिवंत कोंबडी दराने तर कहरच केला आहे. ज्या कोंबडीचा उत्पादन खर्च ७० रुपये येत असताना केवळ १० रुपये किलो या दराने विकावे लागत आहे.
चिकनची मागणीच नसल्याने कोंबड्यांचा उठाव थंडावला आहे. या पक्ष्यांच्या खाण्या-पिण्याचा खर्च अंगावर पडत आहे. हा खर्च मिळणा-या उत्पन्नापेक्षा जास्त होत असल्याने कोंबड्यांच्या आठवडी बाजारात १०० रुपयांना ३ ते ४ याप्रमाणे विकण्याची पाळी पोल्ट्रीधारकांवर आली आहे. काही ठिकाणी तर फुकट विक्री सुरू आहे. आरोग्यमंत्री व राज्य शासनातर्फे चिकनमुळे कोरोना होत नाही, असे वारंवार स्पष्ट केले आहे, तरीदेखील अफवा पसरविणे सुरूच आहे. त्याचा फास पोल्टीधारकांच्या गळ््याला लागला आहे.
नागरिकांचा दुटप्पीपणाचिकन विकत आणायचे म्हटले तर कोरोना विषाणू आहे, असे सांगणारे ते कमी दरात आणि फुकटात मिळत आहे म्हटल्यावर घेऊन खाताना दिसत आहेत. या प्रवृत्तीमुळे मात्र पोल्ट्रीधारक अक्षरश: खड्ड्यात गेले आहेत.शेतकरी संघटनेने कर्जमाफी व नुकसानभरपाईची मागणी केली आहे. होणारे नुकसान मोठे असल्याने ही माफी मिळायला हवी म्हणून स्वाभिमानीने थेट मुख्यमंत्री यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनीही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला आहे.फायदा राहू दे; खर्चही अंगावरएकेक पोल्ट्रीमध्ये ३ ते ८ हजार पक्षी असतात. त्यासाठी १० ते २० लाखांचा खर्च येतो. रोजचा खर्च किमान १५ हजारांचा असतो.कोरोनामुळे फायदा राहू दे, घातलेला खर्चही निघत नसल्याने पोल्ट्री व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे.
आम्ही अक्षरश: रस्त्यावर आलो आहे. ६० दिवसांत कंपनी कोंबड्या घेऊन जात होती; आता ८० दिवस झाले तरी उचल होत नाही. त्यामुळे खाद्यावरचा खर्च दुपटीने वाढला आहे.- विनायक क्षीरसागर, पोल्ट्रीधारक